नाशिक शहराचे तापमान सध्या प्रचंड वाढले असून तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे जाऊ लागला आहे. ऊन्हाच्या तीव्र झळा नाशिककरांना सोसाव्या लागत असून आज (दि.२७) तापमानाची कमाल नोंद ४०.३ इतकी झाली आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची ही लाट जिल्ह्यात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कमाल तापमानाची हंगामातील नोंद रविवारी (दि.२६) ४०.१ अंश अशी सर्वाधिक झाली. सोमवारी तापमानाची ४०.३ नोंद झाल्याने वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे दुपारी १२ ते ५ दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या दुपार सत्रातील विद्यार्थ्यांचे वाढत्या उष्म्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालयीन कामकाजामुळे बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.
गत हिवाळ्यात नाशिकचे तापमान कमी झाल्याने हिवाळा संपताच उन्हाच्या तीव्र झळांना नाशिककरांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारपर्यंत तापमानाचा पारा ३८ अंशावर येऊन थांबला. मात्र तापमानाने चाळीशी गाठल्याने नाशिककर प्रचंड तापले.
२०१६च्या तुलनेत २०१७ या वर्षातील उन्हाळा हा अधिक तापदायक ठरत असल्याचे नाशिककरांना अनुभवयास येत आहे. २५ मार्च २०१६ रोजी ३९.७ तपमानाची नोंद झाली होती. ही नोंद गतवर्षीचा उच्चांक ठरली होती. यंदाही मार्च महिन्यात नाशिककरांना तीव्र उन्हाळा सहन करावा लागत असल्याने तापमान आता तरी कमी होईल का, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.