कडाक्याच्या थंडीपासून यंदा दूर राहिलेल्या नाशिकमध्ये गुरूवारी प्रथमच पारा ९.८ या नीचांकी पातळीवर घसरला. उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडला. थंडगार वारे वाहात असल्याने बोचऱ्या थंडीची अनुभूती मिळत आहे. वातावरणातील बदल किती काळ कायम राहील, पारा आणखी किती खाली घसरतो, यावर थंडीचा मुक्कामही अवलंबून राहणार आहे.

आल्हाददायक हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये थंडी तशी नवीन नाही. डिसेंबर, जानेवारी या काळात दोन-तीन वेळा थंडीची लाट अनुभवयास मिळते. तथापि, दरवर्षी पडणारी थंडी आणि यंदाची थंडी यात कमालीचा फरक राहिला. या वर्षांत प्रत्येक हंगाम महिनाभराने लांबला. दिवाळीत पाऊस पडला होता. दिवाळीनंतर गारवा वाढतो. डिसेंबरमध्ये थंडीची लाट येते.  यंदा मात्र तसे झाले नाही. तापमानात चढ-उतार होऊनही थंडीने प्रतीक्षा करायला लावली. नववर्षांच्या पहिल्या दिवशी चित्र बदलले. एक जानेवारीला १०.३ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मधल्या काळात थंडी पुन्हा अंतर्धान पावली. तापमान १०.६ ते १६ अंशाच्या दरम्यान झुलत होते. जानेवारीच्या मध्यावर अकस्मात बदल झाले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पारा ३.६ अंशाने घसरला. या दिवशी हंगामातील ९.८ तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली. कमालीच्या गारठय़ामुळे सकाळी घराबाहेर पडणाऱ्यांना उबदार कपडे परिधान करणे क्रमप्राप्त ठरले. थंडगार वाराही वाहत असल्याने दिवसा गारवा जाणवत आहे. घसरलेले तापमान पुढील किती दिवस कायम राहील, याबद्दल उत्सुकता आहे. यंदा सलग पाच ते सहा दिवस असा थंडीचा मुक्काम राहिलेला  नाही. उत्तर भारतातील शीत लहरींचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीची लाट येते. पुढील काळात पारा अजून किती खाली जातो, याबद्दल उत्सुकता आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत थंडीने मुक्काम ठोकला होता.

थंडीमुळे द्राक्षांची मागणी कमी

पारा पाच ते सहा अंशांपर्यंत खाली आल्यास द्राक्ष बागांवर परिणाम होऊ शकतो. सध्याच्या तापमानाचा द्राक्षांवर फारसा परिणाम होणार नाही. उलट रंगीत द्राक्षांमध्ये रंग उतरण्यास हे वातावरण लाभदायक ठरेल, असे द्राक्ष बागाईतदार संघाचे अरुण मोरे यांनी सांगितले. तापमान कमालीचे घसरल्यास द्राक्ष मण्यांना तडे जाणे, मण्यांची वाढ खुंटणे असे प्रकार घडतात. अवकाळी पावसाने बागांचे आधीच नुकसान झाले आहे. थंडीमुळे पुन्हा काढणीवर आलेल्या बागांना फटका बसू नये म्हणून उत्पादक खबरदारी घेत आहेत. उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. यामुळे त्या भागातून द्राक्षांना मागणी नाही. सर्वसाधारणपणे तापमान वाढल्यावर द्राक्ष खाण्यास प्राधान्य दिले जाते. थंडी ओसरेपर्यंत द्राक्षांना मागणी येणार नसल्याचे बागाईतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी नमूद केले. सध्या निर्यातक्षम द्राक्षांना ९० रुपये किलोपर्यंतचा दर मिळत आहे.