आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचा दावा
हंगामात सलग दुसऱ्यांदा नाशिकचा पारा ५.५ अंशापर्यंत खाली घसरल्याने अवघा जिल्हा गारठला असला तरी या वातावरणात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे काय स्थिती होईल, या प्रश्नावर राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी थंडी नसल्याचा दावा केला. कडाक्याच्या थंडीत आदिवासी विद्यार्थी कुडकुडत आहेत. त्यांना स्वेटर देण्याची सुरू केलेली प्रक्रिया तक्रारी आल्यामुळे तूर्तास स्थगित करण्यात आली. पुढील थंडीत संबंधित विद्यार्थ्यांना स्वेटर दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
नाशिक जिल्ह्य़ात हंगामात सलग दुसऱ्यांदा थंडीची लाट आली आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानाचा पारा ५.५ ते ७.५ या दरम्यान स्थिरावला आहे. थंडीने मुक्काम ठोकल्याने दिवसाही नागरिकांना उबदार कपडे परिधान करणे भाग पडते. रात्री कमालीचा गारवा निर्माण असल्याने विविध उपाय योजावे लागतात. या स्थितीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडे उबदार कपडे नसल्यामुळे त्यांची बिकट अवस्था झाली आहे. या वातावरणात आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्थितीबाबत बोलताना सावरा यांनी, थंडी नसल्याचे सांगत सर्वाना धक्का दिला. सध्या जाणवणारी थंडी नाही. थंडी कधीच गेली आहे. विद्यार्थ्यांना पुढील थंडीच्या हंगामापर्यंत स्वेटर दिले जातील.