हंगामात सलग दुसऱ्यांदा आलेली थंडीची लाट काहीशी ओसरली असली तरी वातावरणातील गारवा कायम आहे. बुधवारी ५.८ अंशापर्यंत खाली घसरलेले तापमान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ७.५ अंशांवर पोहोचले. तापमानात जवळपास दोन अंशांनी वाढ झाली असली तरी वाऱ्यामुळे गारवा जाणवत आहे.
डिसेंबर महिन्यात हंगामातील नीचांकी म्हणजे ५.४ अंशाची नोंद झाल्यानंतर नववर्षांत प्रथमच नाशिकचे तापमान ५.८ अंशांवर आले होते. पुढील एक ते दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा हवामानशास्त्र विभागाने अंदाजही वर्तविला; परंतु गुरुवारी तापमानात १.७ अंशाने वाढ झाली. या स्थितीतही वातावरणात गारवा जाणवत आहे.
कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी दिवसभर उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागतो. उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी सुरू असून त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्राच्या वातावरणावर पडतो. या वाऱ्यामुळे तापमान उंचावूनही गारवा कायम राहिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गारव्यामुळे सर्वसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी दुसरीकडे द्राक्ष उत्पादक अस्वस्थ झाले आहेत. या वातावरणात द्राक्ष घडात पाणी साचून मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. थंडीपासून बचावासाठी उत्पादक प्रयत्न करत आहेत. रात्रीच्या सुमारास द्राक्ष बागेत काही विशिष्ट अंतरावर ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उबदार वातावरण तयार केले जाते. थंडीचा फटका द्राक्ष बागांना बसू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार थंडीची अचानक आलेली लाट हा कदाचित हवामान बदलाचा परिणाम असू शकतो; काही दिवसांसाठी ही थंडी अशीच कायम राहण्याची चिन्हे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.