जुलै महिन्यातील निम्म्या तिकिटांची आगाऊ नोंदणी

मागील काही वर्षांतील कटू अनुभव बाजूला सारत नाशिकचे हवाई नकाशावरील स्थान पुन्हा नव्याने भक्कमपणे रोवण्याच्या दिशेने मार्गक्रमणावर शुक्रवारी नाशिक-दिल्लीदरम्यान सुरू झालेल्या विमान सेवेने शिक्कामोर्तब केले. पहिल्याच दिवशी दिल्लीहून नाशिक असा १२८, तर नाशिकहून दिल्ली ११९ प्रवाशांनी प्रवास केला. इतकेच नव्हे, तर जुलै महिन्यातील या विमान सेवेची जवळपास निम्म्या तिकिटांची आगाऊ नोंदणी झाली आहे.

उडाण योजनेंतर्गत जेट एअरवेज्च्या दिल्ली-नाशिक आणि नाशिक-दिल्ली या आठवडय़ातून तीन दिवस विमान सेवेला शुक्रवारी प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरुवात झाली. ओझर विमानतळावर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महाराष्ट्र चेंबरचे संतोष मंडलेचा, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मनीष रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. या सेवेमुळे नाशिक देशाच्या राजधानीला जोडले गेले आहे. या विमान सेवेने पैसा आणि वेळेची बचत होणार असल्याची भावना प्रवासी वर्गातून उमटली. या निमित्ताने नाशिक हे जगाशी जोडले गेले आहे. नाशिकहून दिल्ली जाणाऱ्यांना देशांतर्गत तसेच परदेशातील प्रवासासाठी संलग्न विमान सेवा उपलब्ध राहणार आहे. यानिमित्त ओझर विमानतळाचा प्रवाशांसाठी वापर सुरू झाला.

सुरक्षा, संलग्न सेवा यातून रोजगार निर्माण होतील. विमान सेवेमुळे नाशिकला पर्यटकांची वर्दळ वाढून अप्रत्यक्ष रोजगार संधीत लक्षणीय वाढ होणार असल्याकडे शिवकुमार यांनी लक्ष वेधले. रात्री मुंबई विमानतळावर विमाने उभी करण्यास पुरेशी जागा नसते. यामुळे तेथील विमाने ओझरच्या विमानतळावर आणण्याचा पूर्वीचा प्रस्ताव आहे. ‘हॉपिंग फ्लाइट’द्वारे नाशिकला अनेक शहरांशी जोडता येईल. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांवर त्यांनी वाहनतळ म्हणून ओझरचा वापर करताना येथून मुंबई तसेच अन्य ठिकाणी काही नवीन सेवा सुरू करता येईल काय, याचा विचार केला जाणार असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी नाशिक हा देशातील वेगाने विकसित होणारा जिल्हा असून लवकरच ही विमान सेवा दररोज सुरू करावी लागणार असल्याचे सूचित केले. हवाई सेवेतील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन मदतीच्या भूमिकेत आहे. ओझर विमानतळावर ये-जा करण्यासाठी प्रिपेड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येईल. विमानतळ परिसरात कॅफेटेरिया, पाणी आदींसह मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. ओझर गाव ते विमानतळ या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. या रस्त्याचे नूतनीकरण लवकर होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी या विमानसेवेला औद्योगिक क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या माध्यमातून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.

तीन टन आंबे, एक टन भाजीपाला

नाशिक-दिल्ली विमान सेवेसाठी १६८ आसनी विमानाचा वापर केला जात असल्याने माल वाहतुकीची क्षमता वाढली आहे. पहिल्याच दिवशी नाशिकहून तीन टन आंबे लंडनसाठी, तर एक टन भाजीपाला दुबई येथे निर्यात करण्यासाठी या विमानातून दिल्लीकडे मार्गस्थ झाला. या विमानातून एका फेरीत २५०० किलो माल वाहतूक शक्य आहे. आठवडय़ाला साडेसात हजार किलो माल निर्यातदार, शेतकरी यांना दिल्लीमार्ग देशाच्या इतर भागात वा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पाठविता येणार आहे. पहिल्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उडाण योजनेंतर्गत प्रति २८९० (४० आसनांसाठी), सर्वसाधारण ४६५८ तर व्यावसायिक गटातील आसनांसाठी १८ हजार ६९३ रुपये तिकीट लागल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

वेळ आणि पैशांची बचत

सध्या चंदिगड येथे कार्यरत असणारे डॉ. दिग्विजय राणे आणि डॉ. दक्षता राणे हे मूळचे नाशिकचे. पहिल्या दिवशी हे दाम्पत्य नाशिक-दिल्ली विमानाने मार्गस्थ झाले. एरवी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी प्रवासाआधीच किमान आठ तास खर्ची पडायचे. तिकीट दर सारखे असले तरी मुंबईला जाण्यासाठी करावा लागणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ यांची बचत झाल्याचे राणे दाम्पत्याने सांगितले. उद्योजक श्याम पटवे यांनी देशाच्या राजधानीशी जोडणाऱ्या या विमान सेवेचे स्वागत केले. आपण दर महिन्याला दिल्लीला विमानाने प्रवास करतो. रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील तिकिटापेक्षा उडाण योजनेंतर्गत कमी दरात तिकीट उपलब्ध झाले. पुढील तीन महिन्यांची आगाऊ नोंदणी आपण केली आहे. या थेट सेवेमुळे वेळ, पैसा यांची बचत झाल्याचे पटवे यांनी सांगितले. बहुतांश प्रवाशांची अशीच प्रतिक्रिया होती.

विमान तिकीटावरील ‘गांधीनगर’ नोंदीवरून गोंधळ

ओझरच्या विमानतळावरून विमान सेवा सुरू झाली असली तरी विमान कंपन्यांच्या तिकीटावर अद्याप नाशिक शहरातील गांधीनगर या जुन्या विमानतळाची नोंद आहे. हा चुकीचा उल्लेख काही प्रवाशांना तापदायक ठरला. परराज्यातील प्रवाशांनी लष्कराच्या अखत्यारीतील गांधीनगर गाठले. या ठिकाणी लष्कराची धावपट्टी असली तरी तिथे विमानसेवा नाही. गांधीनगरपासून ओझर विमानतळ सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. परराज्यातील प्रवाशांना त्याची कल्पना नसल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. दिल्लीला जाणारे विमान पकडण्यासाठी धावपळ करत त्यांना ओझर गाठावे लागले. तिकीटावर गांधीनगर ऐवजी ओझर विमानतळाचा उल्लेख करण्याची मागणी त्यांनी केली आहे.