मुंबई येथील मॅरेथॉन ट्रेनिंग ग्रुप जॉईंट अ‍ॅण्ड मोशनच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकरी तसेच दुष्काळी परिस्थिती आणि तेथील प्रश्न याकडे लक्ष वेधण्यासाठी १५ मे रोजी सकाळी नाशिक ते मुंबई या दौडचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धामध्ये नावाजलेले २० खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत. या उपक्रमाद्वारे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलीत केला जाणार आहे.
राज्यात सर्वत्र सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी भागातील नागरिकांचे प्रश्न, पाण्याची बचत यासह अन्य काही महत्वपूर्ण प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील मॅरेथॉन ट्रेनिंग ग्रुप जॉईंट अ‍ॅण्ड मोशनने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून नाशिक ते मुंबई हा १६० किलोमीटरचा टप्पा सकाळ ते दुपार या एका सत्रात ही मंडळी पार करणार आहेत. दौडच्या माध्यमातून पाणी म्हणजे जीवन, पाणी वाचविण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण सूचना, दुष्काळग्रस्त भागात पाण्यामुळे येणाऱ्या अडचणी याविषयी सामाजिकतेचे भान बाळगत संदेश दिला जाईल. विविध स्पर्धामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेले २० स्पर्धक यात सहभागी होतील. याविषयी ग्रुपचे डॉ. सुदर्शन सिंग यांनी या उपक्रमात खेळाडूंनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतल्याचे नमूद केले. यासाठी अनेकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या हिमालय क्रॉसिंग रेसचे विजेते ब्रीज शर्मा यांचाही समावेश आहे. स्पर्धेत धावपटूंसह सायकलिस्टही सहभागी होतील अशी अपेक्षा असून नाशिक ते ठाणे असे अंतर त्यांना पार करावयाचे आहे.