प्रारंभीचे दोन ते तीन तास मतदारांविना शांत भासणाऱ्या मतदान केंद्रांवर दुपारी १२ नंतर गर्दी वाढली. जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर तर अक्षरश: रांग लागली. ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा, इगतपुरी तालुक्यांतील केंद्रांवर दुपारी १२ पर्यंत कोणीच फिरकले नव्हते. नंतरच्या दोन तासांत देवळ्यात १०० टक्के मतदान झाले.

नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्य़ातील १५ केंद्रांवर टळटळीत उन्हात मतदान झाले. कागदी मतपत्रिकेवर, पसंतीक्रमानुसार होणारी ही किचकट मतदान प्रक्रिया मतदारांसह उमेदवारांची परीक्षा पाहणारी ठरली. मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अंतिम मतदारयादीनुसार एकूण ६४४ मतदार होते. त्यात नाशिक आणि मालेगाव महापालिकेचे अनुक्रमे १२७, ८९ तर जिल्हा परिषदेचे ७३ आणि पंचायत समितीचे १५ सभापती, नऊ नगरपालिकेतील २१८, सहा नगरपंचायतीतील ११४ तसेच देवळाली छावणी मंडळाच्या आठ सदस्यांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार असणाऱ्या नाशिक आणि मालेगाव शहरातील मतदान केंद्रात प्रारंभीच्या दोन तासांत अनुक्रमे चार आणि २४ मतदारांनी हक्क बजावला. पुढील दोन तासांत म्हणजे १२ वाजेपर्यंत नाशिक शहरात २४, तर मालेगावमध्ये एकूण ३१ मतदारांनी मतदान केले.

पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, चांदवड, कळवण, देवळा या सात तालुक्यांत प्रारंभीच्या दोन तासांत मतदानच झाले नाही. पुढील दोन तासांत परिस्थिती काहीशी बदलली. दुपारी १२ नंतर मतदानाने अधिक वेग घेतल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ६४४ पैकी दुपारी दोन वाजेपर्यंत ४४० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विहित मुदतीत म्हणजे दुपारी चार वाजेपर्यंत १०० टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यात ३२४ पुरुष, तर ३२४ महिला सदस्यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर सकाळपासून काँग्रेस आघाडीचे उमेदवार मतदारांच्या प्रतीक्षेत होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास भाजपच्या नगरसेवकांचे बसमधून आगमन झाले. आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार सानप यांनी हस्तांदोलन करीत सर्वाना सूचक इशारा केला.

भाजपचे एकाच वेळी सर्व नगरसेवक आल्याने केंद्राबाहेर संबंधितांना रांगेत उभे राहावे लागले.   शिवसेनेच्या नगरसेवकांचे मिनी बसमधून आगमन झाले. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सेनेच्या सदस्यांनी घोषणा दिल्या. एरवी या परिसरात आंदोलकांकडून नेहमीच घोषणाबाजी केली जाते. मतदानास जातानाही असा प्रकार घडल्याने रस्त्यावरून मार्गस्थ होणारे वाहनधारक, नागरिक बुचकळ्यात पडले. तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी दृष्टिपथास पडले नाहीत. सेना, काँग्रेस आघाडीचे उमेदवार भ्रमणध्वनीवरून सातत्याने मतदानाचा आढावा घेण्यात, हक्काचे मतदान होईल यासाठी धडपड करताना दिसले.

मतदान केंद्रावरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण

मतदान केंद्रातील घडामोडींचे इंटरनेटद्वारे थेट प्रक्षेपण, केंद्रात भ्रमणध्वनी वापरास र्निबध हे या प्रक्रियेचे वेगळेपण ठरले. थेट प्रक्षेपणामुळे प्रत्येक केंद्रावर काय सुरू आहे, याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात दिसत होती. मतदानाप्रसंगी मतदारांना भ्रमणध्वनी, पेन नेण्यास प्रतिबंध आहे. हाच निकष अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला. परिणामी, भ्रमणध्वनीवर बोलण्यासाठी अधिकाऱ्यांना केंद्राबाहेर यावे लागत होते. केंद्रावर कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. मतदानावेळी मतपत्रिकेवर इंग्रजी, मराठी, रोमन भाषेत आकडे लिहावे लागतील. मतदारांचे मत बाद होऊ नये म्हणून नमुना मतपत्रिका केंद्राबाहेर लावण्यात आली होती.