19 March 2019

News Flash

शहर लवकरच कोंडीमुक्त

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

तीन महिन्यांत एक हजार सायकली; यशवंत मंडई, सीतागुंफाजवळ बहुरचनीय वाहनतळ

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक सायकल सेवेंतर्गत प्रारंभीच्या तीन महिन्यांत एक हजार सायकलची उपलब्धता करण्यात येणार आहे.  त्याचप्रमाणे यशवंत मंडई आणि सीतागुंफाजवळ अनुक्रमे २१२ आणि २५२ मोटारींसाठी स्वयंचलित बहुरचनीय वाहनतळ तसेच त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या प्रायोगिक तत्त्वावरील स्मार्ट रोडच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती या विषयावर बुधवारी आयोजित स्मार्ट सिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संचालक तथा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर रंजना भानसी, अजय बोरस्ते, प्रकाश थविल आदी उपस्थित होते.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे  होणाऱ्या वाहतूक कोंडीतून शहराची मुक्तता करण्यासाठी त्यावर उपाय म्हणून वाहनांचा वापर कमी करण्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात सायकलचा वापर वाढविण्यासाठी सार्वजनिक सायकल व्यवस्था उपलब्ध करण्याची संकल्पना मांडली होती. स्मार्ट सिटी अंतर्गत ही व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात वेगवेगळ्या भागातून नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकल घेऊन मार्गक्रमण करता येईल. फुलोरा फाऊंडेशनला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. फाऊंडेशन सायकलची उपलब्धता, त्यांचे दैनंदिन संचलन आणि देखभाल दुरुस्ती करणार आहे. सार्वजनिक सायकल सेवेसाठी खास अ‍ॅप विकसित करण्याची जबाबदारी फाऊंडेशनवर सोपविण्यात आली. प्रारंभीच्या तीन महिन्यांत फाऊंडेशन एक हजार सायकल उपलब्ध करणार आहे.

कोंडी सोडविण्यासाठी दुसरा उपाय म्हणून रस्त्यालगत, रस्त्यावर तसेच आधुनिक प्रणालीद्वारे बहुरचनीय अभियांत्रिकी वाहनतळाची संकल्पना मांडण्यात आली. बी. डी. भालेकर मैदानावर ३०२ मोटारींच्या वाहनतळासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. आता रविवार कारंजा येथील यशवंत मंडई या ठिकाणी २१२ तसेच पंचवटीतील सीतागुंफा येथे २५२ मोटारींसाठी आधुनिक बहुरचनीय अभियांत्रिकी वाहनतळ उभारणीला मान्यता देण्यात आली. शिवाजी स्टेडिअमवर याच धर्तीवर वाहनतळ उभारण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जात आहे. या मैदानावर ही व्यवस्था करण्यास मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहे. अभ्यासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यासंबंधी निर्णय घेतला जाईल. रस्त्यावरील आणि रस्त्यालगत अशा एकूण ३३ ठिकाणी आधुनिक पद्धतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यासाठी पात्र निविदा बैठकीत उघडण्यात आल्या. पात्र ठरलेल्या दोन निविदाधारकांनी आपापल्या व्यवस्थेचे सादरीकरण केले. या वाहनतळासंबंधी कुलकर्णी उद्यानाजवळ सादरीकरण करण्यात येईल. निवड झालेल्या कंपनीला शहरातील उपरोक्त ठिकाणी स्मार्ट पार्किंगची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या प्रस्तावित स्मार्ट रस्त्याचे काम सी फोर इन्फ्रास्ट्रक्चरला देण्याचे निश्चित करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनासाठी उभारण्यात येणाऱ्या नियंत्रण आणि संचलन केंद्राच्या उभारणीसाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला ४५.४३ कोटी रुपये देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला.

नवीन संचालकांची नियुक्ती

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांच्यासह हिमगौरी आहेर-आडके, शाहू खैरे, गुरूमित बग्गा यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली.

शहरात एलईडी दिवे

शहरात ९१ हजार १५ एलईडी दिव्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. पीपीपी तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या कामात स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या काही परिसरात ही व्यवस्था केली जाईल. महापालिकेने संपूर्ण शहरात हा प्रकल्प उभारण्याची तयारी चालविली आहे. यामुळे वीज बचत होऊन महापालिकेला काही प्रमाणात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून या संपूर्ण व्यवस्थेचे संचलन केले जाईल. रस्त्यांवरील वर्दळ लक्षात घेऊन एलईडी दिवे प्रकाशाची तीव्रता कमी अधिक करतील. या माध्यमातून वीज बचत करण्याचा मानस आहे.

First Published on April 12, 2018 2:21 am

Web Title: nashik traffic issue nashik municipal corporation