News Flash

सीबीएस ते मेहेरदरम्यान वाहने थांबविण्यास मज्जाव

गोदावरीच्या दोन्ही बाजुंना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील हा परिसर असल्याने वाहतुकीचा मोठा भार त्यावर असतो

संग्रहीत छायाचित्र.

कोंडीवर वाहतूक शाखेचा तोडगा;  शहरी व शालेय बसेसना वगळले

अतिशय वर्दळीच्या सीबीएस ते मेहेर सिग्नल दरम्यानच्या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेने या एकेरी पट्टय़ात वाहने उभी करणे वा काही काळासाठी थांबविण्यास देखील प्रतिबंध केला आहे. याच मार्गावर जिल्हा न्यायालयाबाहेर बस थांबा आहे. या निर्बंधातून शहरी बस व स्कूल बसला वगळण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने सीबीएस ते मेहेर सिग्नलदरम्यानच्या मार्गावर उभी केली जातात. ही वाहने उभी केली जाऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी यापूर्वी अनेक प्रयत्न केले. न्यायालयाच्या भिंतीलगत दोरखंड व तत्सम अडथळे लावून खासगी वाहने उभी केली जाणार नाहीत याची दक्षता घेतली होती. कित्येक दिवस पोलिसांचा ताफा सज्ज राहून वाहनधारकांना मज्जाव करण्यासाठी धडपड करीत असे.

सीबीएस ते मेहेर या सिग्नलदरम्यानच्या मार्गावर एका बाजुला सीबीएस बसस्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय व व्यापारी संकुलात बँक व तत्सम कार्यालये आहेत. दुसऱ्या बाजुला शासकीय कन्या विद्यालय, बिटको महाविद्यालय, गृहरक्षक दल कार्यालय आणि पुढे व्यापारी संकुलात हॉटेल, वकील आदींची कार्यालये आहेत. गोदावरीच्या दोन्ही बाजुंना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील हा परिसर असल्याने वाहतुकीचा मोठा भार त्यावर असतो. दिवसभरात हजारो वाहने या भागातून मार्गस्थ होतात. शासकीय कार्यालय, बसस्थानक, न्यायालय, शाळा व महाविद्यालये यामुळे या परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते. या स्थितीत वाहतुकीची जटिल बनलेली समस्या सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने नवीन प्रयोग अंमलात आणला आहे. त्या अंतर्गत सीबीएसकडून मेहेर सिग्नलकडे येणाऱ्या मार्गावर एसटी बस व स्कूल बस वगळता कोणतीही वाहने उभी करता येणार नाही. हा एकेरी मार्ग ‘नो हॉल्टिंग झोन’ तसेच नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वाहतूक शाखेने या संदर्भातील अधिसूचना प्रसिध्द करत त्याची अंमलबजावणी केली.

वाहतूक पोलीस विभाग या मार्गावरील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी ज्या तत्परतेने काम करते, तितकीच तत्परता इतर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दाखविणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. मेहेर सिग्नलला लागून असणाऱ्या महात्मा गांधी रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांविरोधात मोहीम राबविली गेली. परंतु, काही दिवसात ती थंडावली आणि हा मार्ग पुन्हा एकदा चारचाकी वाहनांच्या गराडय़ात सापडला आहे. सध्या नो पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या दुचाकींवर कारवाई केली जाते. परंतु, रस्त्यात ठाण मांडणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीचा बोजबारा उडतो. इतरही अनेक रस्ते अशाच समस्येच्या गर्तेत सापडले आहेत. उपरोक्त भागातही ‘नो हॉल्टिंग झोन’ जाहीर करता येईल काय, याची चाचपणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रिक्षांना हटविण्याचे आव्हान

निर्बंध पोलीस दलाची वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू नाही. सीबीएस ते मेहेर सिग्नलपर्यंतच्या मार्गावर यापूर्वी वाहने उभी करण्यास प्रतिबंध होता. आता या पट्टय़ात सीबीएस सिग्नलवरून मेहेरकडे निघालेल्या वाहनधारकाला आपले वाहन काही वेळेसाठी देखील उभे करता येणार नाही. निर्णयाची अंमलबजावणी झाली असली तरी प्रवाशांच्या शोधार्थ बस थांब्यालगत उभ्या राहणाऱ्या रिक्षांना हटविणे हे मोठे आव्हान आहे. उपरोक्त भागातील स्थितीत नेमका काय फरक पडला, वाहतूक कोंडीची समस्या सुटली की नाही, याची पडताळणी होणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 3:33 am

Web Title: nashik traffic police ban parking between cbs to meher signal
Next Stories
1 प्रवाशांनी मुंबईला जाणे टाळले
2 चार दिवस ध्वनिक्षेपकाचे!
3 ‘समृद्धी’च्या मार्गात इंधन वाहिनीचा प्रश्न
Just Now!
X