नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वाहनचालकांना समज देण्याच्या पलीकडे जात संबंधितांकडून तिप्पट दंड वसुलीची कारवाई वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. चलन कल्लोळामुळे आधीच सुटय़ा पैशांची वानवा असताना अचानक सुरू झालेल्या दंडात्मक कारवाईमुळे मनस्तापात अधिक भर पडल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

शहर पोलिसांच्या पुढाकारातून आयोजित वाहतूक परिषदेत नागरिकांनी वाहनचालकांना कायद्याची जरब बसत नाही, तसेच दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत बेशिस्त वाहनचालक वठणीवर येणार नाही, असे मत नोंदविले. चर्चेतून उमटलेला सूर लक्षात घेऊन पोलिसांनी दंडात्मक कारवाईच्या शुल्कात दुप्पट वा तिपटीने वाढ करत कारवाई सुरू केली. बुधवारी सकाळपासून सिडको, सातपूर, नाशिकरोड, अंबड, पंचवटी, कॉलेजरोड आदी भागांत पोलिसांनी वाहनधारकांची तपासणी सुरू केली. त्यात विनानोंदणी वाहन रस्त्यावर आणणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, परवाना नसलेल्या व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे, वाहन विमा, भरधाव वेगात वाहन चालवणे, वाहनावरील क्रमांक पाटी सुस्थितीत आहे की नाही, रिक्षाचालकांचा बिल्ला व कागदपत्रे, काचांना काळी फिल्म आदींची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत काही वाहनधारकांना समज देत नियम पाळणे व हेल्मेटबाबत प्रबोधन करण्यात आले. या कारवाईत अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठिकठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. रस्त्यात लोखंडी जाळ्या लावून वाहनधारकांना थांबविले गेले. त्यांचा परवाना व वाहन कागदपत्रांची तपासणी केली गेली. अकस्मात झालेल्या कारवाईने वाहनधारकांची भंबेरी उडाली. काहींनी कारवाई टाळण्यासाठी अन्य मार्गाने निघून जाण्याचा पर्याय निवडला, परंतु पुढील ठिकाणी ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

नोटा बंदीचा निर्णय झाल्यापासून नागरिक चलन तुटवडय़ाचा सामना करत आहे. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी कित्येकाची दमछाक झाली आहे. ज्यांच्याकडे दोन हजाराच्या नवीन नोटा आहेत, त्या स्वीकारण्यास नकार दिला जातो. या स्थितीमुळे नागरिक त्रस्तावले असताना वाहनधारकांवरील कारवाईने त्यात आणखी भर पडल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

सध्या अनेकांच्या खिशात जुन्या नोटा आहेत. थोडेफार सुटे पैसे असले तरी त्याचा बेताने वापर करावा लागतो. या स्थितीत दुप्पट वा तिप्पट दंड कसा भरणार, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

वाहतूक परिषदेत खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चलन तुटवडय़ामुळे वाहनधारकांवर तातडीने कारवाई केली जाणार नसल्याचे संकेत दिले होते. तरीदेखील ही कारवाई सुरू करत वाहनधारकांना कोंडीत पकडण्यात आल्याचा सूर उमटत आहे.