News Flash

अवकाळी पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान

१४ मिलीमीटर पाऊस असल्याने तो अवकाळी मानावा की नाही यावरुन संभ्रम

५७५ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका

गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात सुमारे ५०० हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या ५७५ हून अधिक आहे. घराची भिंत कोसळून सात जण जखमी झाले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पंचनामा करण्याचे निर्देश दिल्यानंतर पंचनाम्याचे काम प्रगतिपथावर असून गुरुवारपर्यंत तालुकानिहाय अंतिम अहवाल प्राप्त होणार आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर होणार आहे.

गेल्या रविवारी अकस्मात कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीचा नाशिक, चांदवड, देवळा, बागलाण, मालेगाव, निफाड, सिन्नर, इगतपुरी व कळवण अशा नऊ तालुक्यांना फटका बसला. सर्वाधिक नुकसान निफाड तालुक्यात तर चांदवड व सिन्नर तालुक्यात फारसे नुकसान झाले नाही. त्या दिवशी गारपिटीसह १४ मिलीमीटर पाऊस झाला. प्राथमिक अहवालानुसार निफाड तालुक्यात ३३ टक्क्यांवरील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. त्यात द्राक्ष, कांदा व भाजीपाला असे एकूण २३७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. १३ गावांतील बाधित शेतकऱ्यांची संख्या ३२८ आहे. पिंप्री सय्यद येथे १० ते १२ शेतकरी तसेच ओढा, लाखलगाव येथेही द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यात कोटबेल येथील गिरमल माळी यांच्या दोन शेळ्या पत्र्याची शेड कोसळून मयत झाल्या.

मालेगाव तालुक्यात वळवाडे येथे वादळ वाऱ्याने एका घराचे पत्रे उडाले. इगतपुरी तालुक्यात निफाडसारखे नुकसान झाले आहे. सहा गावातील भाजीपाला, मका, कांदा अशा पिकांचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या ८० आहे. कळवण तालुक्यात कांदा, मिरची, टोमॅटो, मका, डाळिंब असे एकूण १७७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. पाच गावातील बाधित शेतकऱ्यांची संख्या १६७ आहे.
द्राक्ष बागा काढणीचा हंगाम प्रगतिपथावर असताना कोसळलेल्या संकटाने एका झटक्यात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. तशीच स्थिती कांदा उत्पादकांची झाली आहे. उन्हाळ कांद्याचे आयुर्मान अधिक असते. तो साठवून ठेवता येतो. सध्या कांद्याला ४०० रुपये क्विंटल सरासरी भाव आहे. यामुळे अनेकांनी काढलेला कांदा विक्री करण्याऐवजी खळ्यात साठवला होता. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.
तालुकानिहाय संयुक्त पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले.

एप्रिलच्या अखेरीस झालेला आणि केवळ १४ मिलीमीटर पाऊस असल्याने तो अवकाळी मानावा की नाही, याबद्दल टंचाई शाखा विचार करीत आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी काही निकष आहेत. खळ्यात साठविलेल्या कांद्याला मदत देता येते की नाही वा तत्सम बाबी तपासणीचे कामही समांतरपणे सुरू आहे. अवकाळी पावसाबाबत मदत द्यायची की नाही याचा निर्णय शासन पातळीवर होत असल्याचे प्रशासनाने सूचित केले.

भिंत कोसळून सहा जखमी
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात घरांची पडझड होऊन सात जण जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. देवळा तालुक्यात झिरे पिंपळ येथील घराची भिंत कोसळून प्रमिला आहेर (३५), कुणाल आहेर (७), कल्याणी आहेर (५), माऊ आहेर (५) हे चार जण जखमी झाले. मौजे देवळा शिवार येथे घराची भिंत कोसळून माधुरी पवार (२८) आणि सीमा जाधव (३५) हे जखमी झाले. याच तालुक्यात झिरे पिंपरे येथे एकनाथ शिरसाट हे वीज पडून जखमी झाले. यशवंत सोनवणे यांच्या चार शेळ्या वीज पडून मृत्युमुखी पडल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 10:51 pm

Web Title: nashik unseasonal rain farmer affected
Next Stories
1 शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर विशेष भर: गिरीश महाजन
2 पिसाळलेल्या कुत्र्याचा नागरिकांवर हल्ला, ६ जण गंभीर जखमी
3 नाशिक पोलीस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन
Just Now!
X