• विधान परिषद निवडणुकीतभाजप द्विधा मनस्थितीत
  • मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीनंतरही संदिग्धता कायम
  • १८ किंवा १९ मे रोजी भूमिका जाहीर होणार

नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवाराला साथ देऊन शिवसेनेशी थेट संघर्ष करावा की एक पाऊल मागे घेत सेनेला मदत करावी, या द्विधा मनस्थितीत भाजप सापडल्याचे मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून अधोरेखीत झाले. अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी हे देखील यावेळी उपस्थित होते.  मतदानाच्या तीन दिवस आधी १८ किंवा १९ मे रोजी आधी भाजप आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजपने संदिग्धता कायम राखल्याने शिवसेनेसह अपक्ष उमेदवाराची अस्वस्थता वाढली आहे.

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला नाही. या पक्षाशी संबंधित परवेझ कोकणी हे अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याने निवडणूक तिरंगी झाली आहे. त्या अनुषंगाने रणनीती निश्चित करण्यासाठी मंगळवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्थानिक आमदार, महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि अन्य मतदार यांची बैठक झाली. सुमारे १५० मतदार, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

६४४ मतदार असलेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाजवळ पहिल्या पसंतीची आवश्यक मते मिळविण्याइतपत संख्याबळ नाही. यामुळे निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कागदावर दिसणारे संख्याबळ गुप्त मतदानात कायम राहील की नाही, याबद्दल सर्वच पक्ष साशंक आहे. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या सदस्यांना जिल्ह्य़ाबाहेर रवाना करण्यास प्राधान्य दिले. काँग्रेस आघाडीकडूनही तोच मार्ग अनुसरला जाण्याची शक्यता आहे. बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व सदस्यांना एकत्रित राहण्याची सूचना केली. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार सर्वानी मतदान करावे, असे आवाहन केले आहे.  राज्यातील दोन पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने सहकार्य केले नाही. विधान परिषद निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढविण्याचे ठरले होते. ज्या ठिकाणी अधिक संख्याबळ, तिथे उमेदवार उभे करण्यात आले. नाशिक विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला भाजप पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, मागील काही दिवसात राज्यात घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत विधान परिषदेबाबत निर्णय झाला नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. शुक्रवारी किंवा शनिवारी म्हणजे मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी भाजप याबाबत निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

निर्णयाला विलंब झाल्यास समीकरण जुळविणे अवघड होणार असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. १७८ संख्याबळ असणाऱ्या भाजपच्या संख्याबळाला मतदानात कमालीचे महत्व आहे. भाजपने कोकणींना पाठिंबा दिल्यास आपली अडचण होईल, अशी शिवसेनेला भीती आहे.  लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सेना-भाजप परस्परांविरुद्ध उभे आहेत. त्याचे प्रतिबिंब विधान परिषद निवडणुकीत उमटून भाजप अपक्ष उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत नाशिक विधान परिषद मतदारसंघातील भाजपचे दीडशेहून अधिक सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीत काय करायचे, याबद्दल १८ किंवा १९ मे रोजी पक्ष निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पक्ष जो आदेश देईल, तो सर्वाना मान्य राहणार असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचीही तयारी करण्याची सूचना केली आहे.

दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप