News Flash

नाशिकला नावीन्यपूर्ण लष्करी उपक्रम केंद्राची वर्षभरानंतरही प्रतीक्षा

केंद्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांना केंद्राकडून निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली.

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये लष्करी सामग्रीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्र (डिफेन्स इनोव्हेशन हब) उभारण्याची घोषणा झाली होती. वर्षभराचा कालावधी उलटूनही लष्करी सामग्री उत्पादनास चालना देणाऱ्या या केंद्राची प्रतीक्षाच आहे. उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या निमा संघटनेने त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर केला. नंतर स्थानिक पातळीवर विकसित करता येईल, अशा १२७ सुटय़ा भागांची निवड केली. दुसरीकडे लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात संरक्षण उत्पादन विभागाने तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील लष्करी सामग्री उत्पादन केंद्र वगळता देशात कुठेही केंद्र उभारण्याचा प्रस्ताव नसल्याचे म्हटले आहे. यात नाशिकचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला. परंतु, लष्करी सामग्री उत्पादन आणि नावीन्यपूर्ण उपक्रम या केंद्राच्या संकल्पना वेगवेगळ्या असल्याचे निमाने म्हटले आहे.

संरक्षण सामग्रीची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खरेदी धोरणात बदल करत देशातील खासगी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा मार्ग स्वीकारला. लष्करी सामग्री केंद्राच्या माध्यमातून लहान-मोठय़ा उद्योगांना चालना देण्याचा मानस आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळात ही संकल्पना मांडली गेली. त्यानुसार तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे देशातील पहिल्या लष्करी सामग्री उत्पादन केंद्राचे उद्घाटन झाले. तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी घोषित केलेल्या लष्करी नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्राची प्रक्रिया तुलनेत संथ आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्टर्स (एसआयडीएम), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीने १७ जानेवारी २०१९ रोजी ओझर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात नाशिकमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्र उभारण्याचे जाहीर झाले होते. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी निमावर सोपविण्यात आली होती. स्थानिक पातळीवर कोणते उद्योग आहेत, कोणत्या क्षेत्रात ते काम करू शकतील आदी माहिती घेऊन संरक्षण सामग्री निर्मितीतील सार्वजनिक उद्योगांच्या उत्पादनांशी त्यांची सांगड घालण्याचा मनोदय व्यक्त झाला. केंद्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांना केंद्राकडून निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली.

नाशिकच्या केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल निमाने तयार केला. संरक्षण मंत्रालयाकडून त्यात काही सुधारणा, बदल सुचविण्यात आले. त्यानुसार अद्ययावत अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर करण्यात आला. लवकरच याबाबत सामंजस्य करार होणार असल्याचे निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी सांगितले. लोकसभेतील प्रश्नोत्तरात तमिळनाडूमध्ये एक आणि उत्तर प्रदेशमध्ये एक अशा दोन केंद्रांचा निर्णय झाल्याचे सांगितले गेले. सद्य:स्थितीत देशात कुठेही अतिरिक्त केंद्र उभारण्याचा प्रस्ताव नाही. संरक्षण उत्पादन विभागाच्या निवेदनात नाशिकचा उल्लेख नसल्याने उद्योजकही संभ्रमित झाले. या संदर्भात तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. भामरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

लष्करी सामग्री उत्पादन केंद्र आणि नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्र या भिन्न संकल्पना आहेत. हे आधी लक्षात घेतल्यास संभ्रम होणार नाही. नाशिकच्या नावीन्यपूर्ण केंद्राचा प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर संरक्षण उत्पादन विभागाने स्थानिक पातळीवर कोणत्या सुटय़ा भागाची निर्मिती करता येईल, याबाबत विचारणा केली. या क्षेत्रातील सार्वजनिक उद्योगांना लागणाऱ्या सुटय़ा भागाचे अवलोकन करून १२७ भाग निवडण्यात आले. स्थानिक पातळीवर त्यांचे उत्पादन करता येईल, असे संबंधित उद्योगांना कळविण्यात आले. नाशिकच्या नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्रासाठी इमारत, सुटे भाग निर्मितीसाठी संयुक्त व्यवस्था, उत्पादन तपासणीसाठी प्रयोगशाळा आदींसाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या केंद्रासाठी कंपनीची स्थापना केली जाणार आहे. या केंद्राद्वारे संरक्षण उद्योग क्षेत्रात नावीन्यपूर्ण संकल्पना, संशोधन, नवउद्यमींसह उत्पादनास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.     

– प्रदीप पेशकार (पदाधिकारी, निमा)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 4:34 am

Web Title: nashik waiting for defence innovation hub zws 70
Next Stories
1 स्थायी सभापती निवडणूक स्थगित
2 माथाडी कामगारांच्या संपामुळे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प
3 ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम तक्रारदारास परत
Just Now!
X