अभयारण्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तयारी

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हजारो परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असताना नाशिक वन्यजीव विभागाच्यावतीने १९ ते २१ जानेवारी या कालावधीत पहिल्या पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत निरीक्षण, पक्षी आणि नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मनोरंजन कार्यक्रम, छायाचित्र स्पर्धा, पक्ष्यांवरील टपाल तिकीटांचे प्रदर्शन, हेरिेटेज वॉक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलन कालावधीत दररोज ५० शालेय विद्यार्थ्यांना नांदूरमध्यमेश्वर येथे नेण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ‘प्रथम येईल, त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर हा उपक्रम होणार असल्याने शाळांनी त्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले. संमेलनाच्या माध्यमातून नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य हे पक्षीतीर्थ म्हणून नावारूपास आले आहे. दरवर्षी हिवाळ्यात अभयारण्यात येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पक्षी बघण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी देखील वाढत आहे. वन विभागाने पर्यटकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करत त्याचे व्यवस्थापन चापडगाव ग्राम परिसर विकास समितीकडे सोपविण्यात आले आहे. अभयारण्यात प्रवेशासाठी ३० रुपये शुल्क आहे. पक्षी निरीक्षणासाठी समितीने दुर्बिणीची व्यवस्था केली असून त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. छायाचित्र काढावयाचे किंवा छायाचित्रण करावयाचे असल्यास शुल्क द्यावे लागते. या माध्यमातून गतवर्षी समितीला सव्वा तीन लाख रुपयांचे उत्पन्न झाले. यंदा हे उत्पन्न पहिल्याच महिन्यात पाच लाखापर्यंत गेले आहे. यंदापासून कॅमेरा, दुर्बीण शुल्काची आकारणी सुरू झाल्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पक्षी संमेलनाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील पर्यटन स्थळांचे विपणन होणार आहे.

या महोत्सवातील उपक्रमांची माहिती वनसंरक्षक (वन्यजीव) एन. आर. प्रवीण आणि साहाय्यक वन संरक्षक भरत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय पक्षी संमेलनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी दिली.  संपूर्ण संमेलनात सहभागी होण्यासाठी तसेच काही विशिष्ट दिवशी सहभागीत्वासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. नोंदणी, कार्यक्रमाची रुपरेषा, विविध स्पर्धाचे नियम आदींची माहिती डब्लूडब्लूडब्लू. बर्डफेस्टिव्हल.नाशिक वाईल्डलाईफ.कॉम आणि डब्लूडब्लूडब्लू.नाशिकवाईल्डलाईफ.कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भ्रमंती, निरीक्षण, प्रदर्शन

प्रथमच होणाऱ्या संमेलनात पक्ष्यांवर आधारित विविध कार्यक्रम होतील. त्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी सकाळ आणि सायंकाळी खास भ्रमंती, पक्षी आणि नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य तसेच पक्षी निरीक्षण, छायाचित्रण या विषयावर मार्गदर्शन, मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, नांदुरमध्यमेश्वर ‘बर्ड रेस’, अभयारण्यावरील छायाचित्रांचे प्रदर्शन, ‘हेरिटेज वॉक’ आदी उपक्रम होतील तसेच नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल.

खुली निसर्गचित्रण स्पर्धा

पक्षी संमेलनात १२ जानेवारी रोजी सकाळी खुल्या निसर्गचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी जाहीर केला जाईल. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास सात हजार आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास पाच हजार आणि तृतीय क्रमांकास तीन हजार आणि प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी दोन हजार रुपयांची दिली जातील.