जिल्हा परिषद, पंचायत समिती  दिंडोरी तालुका

नाशिक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दिंडोरी तालुक्यात मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात आल्याने पक्षातंर्गत हालचालींना वेग आला असून महिलांसाठी राखीव जागांवर आपल्याच घरात उमेदवारी कायम राहावी यासाठी पतीजन कामाला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मुलाखतींचे सोपस्कार पूर्ण झाले आहे. शिवसेना-भाजप यांच्यात कोणत्याही प्रकारची युती राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी युती होणार नाही हे गृहीत धरून दोन्ही पक्षांकडून याआधीच तयारी करण्यात आल्याने युती तुटल्याचा फारसा धक्का दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बसलेला नाही. आजी-माजी आमदारांच्या वर्चस्वाची लढाई म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

काही पक्षांकडे उमेदवारीसाठी भाऊगर्दी झाली असताना अनेक पक्ष उमेदवारांच्या शोधात आहेत. काही उमेदवार तिकीट मिळेल त्या  पक्षाच्या शोधात असून प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवार आपल्याच पक्षातील इतर इच्छुकांचा पत्ता कट करण्यात व्यस्त आहे.

राष्ट्रवादीची संपूर्ण जबाबदारी ज्येष्ठ नेते कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्यावर असल्याने त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढत चाचपणी दौरा पूर्ण केला. शिवसेना नियोजनात मागे असून भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवरही नाराजी आहे. त्यातच आता शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याने दोन्ही पक्षांची खरी ताकद कळणार आहे.

अनेक वर्षांपासून दिंडोरी तालुक्यात माजी आमदार रामदास चारोस्कर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील विधानसभा निवडणुकीत चारोस्कर हे कॉंग्रेसमध्ये गेल्याने तालुक्यातील कॉंग्रेसला अचानक संजीवनी मिळाली. त्यांच्या रूपाने दिंडोरी नगरपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात आली. त्यात नगरसेवक माधवराव साळुंखे यांचा सिंहाचा वाटा आहे. मोहाडी, उमराळे वणी  व कोचरगाव या चार गटावर त्यांचा मोठा प्रभाव असून त्यांची भूमिका या गटामध्ये निर्णायक राहणार आहे,

माजी आमदार धनराज महाले यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी खेडगाव गटातून उमेदवारीची चर्चा सुरू आहे. आरक्षणामुळे सहा गट आणि नऊ गणांमध्ये महिलाराज येणार असल्याने आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी पतीराज सरसावले आहेत.

दिंडोरी तालुक्यातील राजकारणात सर्वात महत्वाची व निर्णायक भूमिका बजावणाऱ्या वणी गटाने आजी-माजी आमदारांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला असल्याने या गटातील निवडणूक ही आजी आमदार नरहरी झिरवाळ व माजी आमदार धनराज महाले यांच्यासाठी  प्रतिष्ठेची आहे. आरक्षणामुळे शिवसेना पुरस्कृत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गांगुर्डे, वणी गणातील शिवसेनेचे सदस्य अ‍ॅड. विलास निरगुडे, शिवसेनेचेच लखमापूर गणातील गणेश शार्दुल यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी हुकली आहे. आरक्षणानूसार वणी गटासह वणी व लखमापूर गण अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्याने वणी गटात प्रथमच महिलाराज येणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वणी गटात मागील निवडणुकीत परिवर्तन होऊन वणी गटासह वणी व लखमापूर गणात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. राष्ट्रवादीसह भाजपा, कॉग्रेस पक्षानेही निवडणुकीसाठी चांगलीच वातावरण निर्मिती केली असून यासर्वांसमोर मनसे व माकप पक्षाचे आव्हान कायम असणार आहे.

मोहाडी गणात शिवसेनेच्या माधुरी गणोरे व प्रवीण जाधव निवडून आले होते. आरक्षणामुळे आता त्यांनाही निवडणूक लढविता येणार नाही. त्या ठिकाणी शिवसेनेच्या जऊळके दिंडोरी येथील सरपंच भारती जोंधळे या इच्छूक असून संपूर्ण गटात दौरा केला आहे. राष्ट्रवादीचे सुदाम भोये पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून तयारी करत आहेत. खेडगाव गटात राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विद्या पाटील या मागील निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. मतदारांनी राष्ट्रवादीला डावलत शिवसेनेच्या शोभा डोखळे यांना निवडून दिले. जिल्हा परिषदेत डोखळे यांनी महिला व बाल कल्याण सभापतीपद मिळविले. त्यामुळे या गटात कोण उमेदवारी करणार, हे महत्वपूर्ण ठरणार आहे. उमराळे गटात होणार चौरंगी लढत होणार आहे,  तालुक्यातील एकमेव भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा बोडके यांचा रस्ता आरक्षणामुळे बंद झाला आहे. असे असले तरी त्या व त्यांचे पती याच गटातील दोन्ही गणातून पुन्हा चाचपणी करताना दिसत आहे. आता त्या उमराळे गणातून उभे राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे हेही मडकीजांब गणातून उमेदवारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहिवंतवाडी गट आजपर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. या गटाने दोन आमदार, एक जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती दिले आहेत. त्यामुळे या गटातून कोण उमेदवारी करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे.

तालुक्याची स्थिती

तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गण आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी दोन गट , शिवसेना तीन आणि भाजपच्या ताब्यात एक गट आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रत्येकी पाच, मनसे, भाजप प्रत्येकी एक सदस्य आहे.

शिवसेनेची यादी तयार, भाजपला उमेदवार मिळणे मुश्किल

मुंबईत युती तुटल्याची घोषणा करण्यात आल्यावर त्याचे पडसाद दिंडोरी तालुक्यातही उमटले आहेत. युती होणार नसल्याचे गृहीत धरून आधीच शिवसेनेने तयारी केली आहे.  गट, गण याप्रमाणे आमच्याकडून इच्छूक उमेदवारांची यादी तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी म्हटले आहे. दुसरीकडे भाजपकडे सर्व गट, गणांसाठी उमेदवार मिळणे मुश्किल झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कावळे, महेंद्र पारख, प्रकाश ठाकरे, विलास देशमुख यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी सेनेच्या विरोधात बोलणे टाळले असले तरी त्यांनीही स्वबळावर लढण्याची आधीच तयारी केली होती, असे नमूद केले. आम्हांला आमचा पक्ष तळागाळात पोहचवायचा असल्याने प्रत्येक गट, गणात उमेदवार उभा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात मागील निवडणुकीत उमराळे गटात भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. मनसे यावेळी काही जागा लढविणार असून उपजिल्हा प्रमुख मनोज ढिकले यांनी तालुक्यात दौरा करून चाचपणी केली आहे. मागील निवडणुकीत मनसेने सहा गटांपैकी तीन, तर १२ गणांपैकी सहा ठिकाणी उमेदवार दिले होते. परंतु त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. पालखेड गणात खंडेराव गोतरणे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून ते सभापतीही झाले होते. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत तालुकाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी राजीनामा दिल्याने मनोज ढिकले यांच्यावर अधिक जबाबदारी आली आहे. मनसेचे फारसे अस्तित्व नसल्याने इतर पक्ष एकमेकांची मते खाण्यासाठी मनसे उमेदवारांना रसद पुरवू शकतात, असे म्हटले जात आहे.