शहर बससेवा चालविण्याच्या ठरावाची वर्षपूर्ती होण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप नवीन डेपो, इलेक्ट्रिक किंवा सीएनजी-डिझेल बसचे विषय निविदा प्रक्रियेत, तर बस डेपो, टर्मिनल, बस थांबे उभारण्याच्या निविदेत फेरप्रस्ताव, प्रकल्प व्यवस्थापन संस्थेची नेमणूक आदी बाबी वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. तांत्रिक अडचणी, काही बाबींवर निविदांना न मिळालेला प्रतिसाद यामुळे पालिकेची बससेवा प्रत्यक्षात रस्त्यावर कधी येणार हे खुद्द प्रशासनाला सांगणे अवघड झाल्याचे लेखी उत्तरावरून दिसून येते.

राज्य परिवहनकडून चालविली जाणारी शहर बससेवा महापालिकेने स्वत: सुरू करण्याचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत होता. मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेत महापालिकेमार्फत शहर बससेवा चालविण्यास मान्यता दिली गेली. या ठरावास वर्ष पूर्ण होण्यास काही दिवसांचा कालावधी असताना पालिकेच्या बससेवेचा मुहूर्त निश्चित झालेला नाही. या संदर्भात नगरसेविका वर्षां भालेराव यांनी बससेवेबद्दलची सविस्तर माहिती मागितली होती. शहर बससेवेसाठी नाशिक महानगर परिवहन कंपनी स्थापन केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ४०० बस सेवेत आणल्या जातील. त्यातील १५० इलेक्ट्रिक उर्वरित ५० डिझेलवर आधारित आणि २०० सीएनजी गॅसवर चालणाऱ्या असतील. यासाठी महापालिकेने तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. इलेक्ट्रिक बसच्या निविदेच्या तांत्रिक तपासणीचा टप्पा नुकताच पार पडला. सीएनजी, डिझेल बसच्या निविदेचाही तोच टप्पा सुरू आहे. बससेवेसाठी तपोवन, आडगाव ट्रक टर्मिनस येथे नवीन डेपो बांधले जाणार आहेत. त्याच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. बससेवेत आधुनिक तंत्रावर आधारित तिकीट प्रणाली राखण्याचा मानस आहे. त्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याच्या निविदेची सध्या तांत्रिक तपासणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

बससेवेशी संबंधित अनेक विषय निविदा प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यामुळे बस प्रत्यक्षात रस्त्यावर कधी धावतील, हे सांगणे प्रशासनाला अवघड झाल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या शहर बससेवेबद्दल आजतागायत काय प्रगती झाली, केव्हापर्यंत बस रस्त्यावर धावतील, याविषयी सविस्तर माहिती मागितली होती. त्याअंतर्गत सुरू असलेल्या प्रगतीला तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणास्तव वेळ लागत आहे. शहरवासीयांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बससेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची नितांत गरज आहे.

– वर्षां भालेराव (नगरसेविका)