जेट एअरवेजचे पाठबळ: नाशिक-दिल्ली सेवा १५ जूनपासून सुरू

 नाशिक : उडाण योजनेंतर्गत हवाई नकाशावर येऊन एअर डेक्कन कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे लुप्त झालेली नाशिकच्या विमान पुन्हा नव्याने पावसाळ्यात सुरू होणार आहे. ऐन पावसाळ्यात अर्थात १५ जूनपासून दिल्ली-नाशिक आणि नाशिक-दिल्ली अशी आठवडय़ातून तीन दिवस विमान सेवा सुरू करण्यात येत आहे. सेवेला आता या क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या जेट एअरवेज्चे पाठबळ लाभणार आहे.

उडाण योजनेमुळे नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे या मार्गावर सुरू झालेली विमान सेवा तीन महिन्यांत ठप्प झाली. वैमानिकांचे प्रशिक्षण हे कारण पुढे करत काही दिवस एअर डेक्कनने वेळ मारून नेली. मात्र, जाहीर केलेल्या मुहूर्तावर कंपनीचे विमान अवकाशात झेपावू शकले नव्हते. उडाण योजनेच्या मूळ उद्देशाला एअर डेक्कनने सुरुंग लावल्याचा आरोप करत या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली गेली. या घडामोडींमुळे अधांतरी बनलेल्या नाशिकच्या विमान सेवेला जेट एअरवेजच्या घोषणेमुळे बळ मिळाले आहे.  नाशिक-दिल्ली विमान सेवेसाठी कंपनी बोईंग प्रकारातील विमान वापरणार आहे. त्यात १२ आसन विशेष श्रेणीतील तर १५६ आसन हे सर्वसाधारण श्रेणीतील राहणार आहेत. आठवडय़ातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी दिल्लीहून नाशिकला १२ वाजता झेपावणारे विमान दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ओझर विमानतळावर उतरेल. नंतर हेच विमान दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना होईल. दिल्ली विमानतळावर ते चार वाजून २५ मिनिटांनी उतरणार आहे. म्हणजे, नाशिकहून दोन तासात थेट दिल्ली गाठण्याची संधी उपलब्ध होईल.

दिल्ली-नाशिक आणि नाशिक-दिल्ली विमान प्रवासासाठी आगावू नोंदणी करणाऱ्यांना तिकीटात काही अंशी सवलत मिळेल. सर्वसाधारणपणे हे तिकीट साडेतीन ते चार हजार रुपयांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास खा. हेमंत गोडसे आणि तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला. जेट एअरवेज काही महिन्यांपासून या अनुषंगाने सर्वेक्षण, पाहणी, पडताळणी, चर्चा करीत होते. उन्हाळ्यात उत्तरेकडील विविध भागात सहली जातात. ऐन पावसाळ्यात ही सेवा सुरू होत असल्याने प्रतिसादाकडे सर्वाचे लक्ष आहे. उत्तर महाराष्ट्रातून पर्यटन, शासकीय- वैयक्तिक कामे, राजकीय कारणांस्तव दिल्लीला अनेक जण जातात. आगावू नोंदणीचे हवाई तिकिटाचे दर पाहिल्यास रेल्वे प्रवासाच्या तुलनेत काहीसे जास्त असले तरी ते परवडू शकतात.

इंडिगो कंपनी लवकरच नाशिक-बेंगरुळू विमान सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. एअर इंडिया, गो एअर हवाई कंपन्यांकडून नाशिकहून विमान सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. या कंपन्यांच्या सेवा सुरू झाल्यास वर्षभरात नाशिक देशातील प्रमुख पाच ते सहा ठिकाणांशी हवाईमार्गे जोडले जाईल, असे भालेराव यांनी नमूद केले.

आगावू नोंदणी २९१४ रुपयात

नाशिक-दिल्ली अथवा दिल्ली-नाशिक विमान प्रवाासासाठी आगावू तिकीट नोंदणी करणाऱ्यांना एका बाजूच्या प्रवासासाठी २९१४ रुपये दर असल्याचे दिसते. ऐनवेळी नोंदणी करणाऱ्यांना साधारणत साडेतीन ते चार हजार रुपये तिकीट दर राहील, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. साडेतीन हजार रुपये तिकिटासाठी द्यावे लागले तरी प्रवाशांना ते परवडू शकते. कारण, दिल्लीला जाण्यासाठी सध्या प्रवाशांना मुंबई गाठावी लागते. त्यासाठी मोटारीचा दोन हजार रुपये खर्च येतो. प्रवासात वेळही जातो. त्या तुलनेत स्थानिक पातळीवरून थेट दिल्लीला जाण्याची सुविधा मिळणार असल्याकडे संबंधितांकडून लक्ष वेधले जात आहे.