ढोल-ताशाच्या साथीने आसमंतात फडकणारा भगवा ध्वज, पारंपरिक वेशभूषा परिधान करत तालबद्ध सुरू असणारी आवर्तने.. शंखध्वनी.. हे सारेच वातावरण प्रत्येकावर गारूड करते. ढोल-ताशांची ही खासीयत पकडत ‘बॉश’चे पदाधिकारी कंपनीच्या बंगळुरू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिक ढोलचे सादरीकरण करणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांचा सरावही सुरू झाला आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवडय़ात बॉश कंपनीतर्फे बंगळुरू येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘प्रायमा वेरा’ या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या ज्या ठिकाणी कंपनी कार्यरत आहे, तेथील प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार आहेत.
कंपनीचे दर वर्षीचे लक्ष्य, पुढील ध्येयधोरणे या पलीकडे जात महोत्सवात वेगवेगळ्या प्रांत संस्कृतीचा परिचय व्हावा, यासाठी खास सांस्कृतिक सत्र होणार आहे. या महोत्सवात राज्यातून नाशिकचे पदाधिकारी सहभागी होणार असून नाशिकची खासीयत असलेले ‘नाशिक ढोल’ त्या वेळी वाजविण्यात येणार आहे. एरवी सांस्कृतिक महोत्सवात पारंपरिक लोककला किंवा त्या त्या भाषेतील चित्रपटातील गीतांवर लोकनृत्य हे नेहमीचे आहे. मात्र काही तरी वेगळे द्यायचे या ध्येयातून नाशिक ढोलची निवड करण्यात आली.
यासाठी कंपनीतील २० ते ३० वयोगटातील मुला-मुलींची चाचणीद्वारे निवड करत त्यांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. जुलै महिन्यात दररोज दुपारी दोन तास कंपनीच्या आवारात शिवसाम्राज्य पथकाचे कुणाल भोसले, सागर चौधरी आणि महेंद्र नागपुरे त्यांना प्रशिक्षण देत आहेत.
ढोलवादन शिकण्यासाठी उत्साही कलावंतांची संख्या मोठी होती. मात्र त्यातील निवडक ३० जणांना या ढोल-ताशा पथकात सहभागी होता आले.
सध्या त्यांना ढोल, टोल (झांज), शंख, ध्वज यांसह अन्य काही साधनांची माहिती देत आवर्तने, टाळी शिकवण्यास सुरुवात झाली आहे. पारंपरिक आवर्तनासह नव्या चालीही यात शिकविल्या जात आहेत.