मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची ग्वाही

देशातील अ श्रेणीच्या ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार असून त्यात नाशिक, मनमाडसह मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील १२ स्थानकांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी येथे दिली.

विभागातील भुसावळ ते खंडवादरम्यानच्या रेल्वेमार्ग व स्थानकांचे निरीक्षण केल्यानंतर येथे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सूद यांनी ही माहिती दिली. निरीक्षण दौऱ्यात महाप्रबंधकांसमवेत विविध अधिकारी सहभागी झाले होते. विमानतळाप्रमाणे विकास आराखडय़ाच्या धर्तीवर भुसावळ विभागातील नाशिक, भुसावळ, मनमाड, जळगाव, अकोला, बऱ्हाणपूर, खंडवा याप्रमाणे अ दर्जा असलेल्या १२ स्थानकांचा विकास करण्यात येणार असल्याचे सूद यांनी सांगितले. रेल्वे स्थानकांच्या दोन्ही बाजूने असलेल्या प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण करून स्थानकाजवळील जागा किंवा इमारतीच्या वरचा भाग व्यावसायिक वापरासाठी देऊन अन्य जागा त्यांच्याकडून विकसित करून घेण्यात येणार आहे. त्यात प्रवाशांसाठी आधुनिक प्रतीक्षालय, विश्रामकक्ष यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा व सूचना मागविण्यात आल्या असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.

नाशिकरोड रेल्वे स्थानकास सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे काहीसा उजाळा मिळाला असला तरी अद्याप स्थानकामध्ये बरेचसे काम बाकी आहे. स्थानकाला नवीन रूप देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असला तरी ते अपूर्ण पडत आहेत. त्यामुळेच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनीच आता नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिल्यामुळे स्थानकाला नवीन झळाळी प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईतील लोकल रेल्वेसेवेच्या धर्तीवर भुसावळ- नाशिकदरम्यान रेल्वेसेवा सुरू होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याविषयी विचारण्यात आले असता महाव्यवस्थापकांनी या रेल्वेसेवेसाठीचे डबे कारखान्यातून तयार होऊन आल्यावर किंवा जळगाव-भुसावळमध्ये तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यावर भुसावळ- नाशिकदरम्यान ही सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

त्यांच्या या उत्तरामुळे ही सेवा सध्या तरी अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने कोणतीही नवीन गाडी न चालविता विद्यमान आर्थिक वर्षांत अनेक प्रवासी गाडय़ांना विविध श्रेणींचे १०० डबे जोडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ झाल्याची माहितीही सूद यांनी दिली.