स्थायी समिती सभापतीपदासाठी आज निवडणूक ; महाविकास आघाडीत बिघाडी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. निवडणुकीत मनसे भाजपला साथ देणार आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर बिघाडी असल्याचे चित्र उघड झाले आहे.

स्थायी समिती सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार असून सोमवारी भाजपच्या वतीने गणेश गिते यांनी अर्ज सादर केला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, मनसेचे अनंता सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना स्वप्न पाहते. ते त्यांनी कायम बघत रहावे, असा टोला महापौरांनी लगावला. सूर्यवंशी यांनी मनसे पहिल्यापासून भाजपसोबत असल्याचे नमूद केले.

महापालिकेची आर्थिक तिजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर वर्चस्व राखण्यासाठी सत्ताधारी-विरोधकांमध्ये चढाओढ होईल, असे दिसत होते. न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपचा एक सदस्य कमी होऊन शिवसेनेचा एक सदस्य वाढला. यामुळे सत्ताधारी-विरोधी पक्षात समान संख्याबळ झाले. त्यामुळे सभापती निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता होती. परंतु, मनसे भाजपसोबत गेली. काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक सदस्य सोबत येतील की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली. अखेर शिवसेनेला तटस्थ राहण्याच्या निर्णयाप्रत यावे लागले. या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याचे सेनेचे मनसुबे घटक पक्षातील सदस्यांमुळे प्रत्यक्षात येऊ शकले नाही. शिवसेना मैदानात नसल्याने भाजपच्या गणेश गिते यांची सलग दुसऱ्यांदा स्थायी सभापती निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणे तेवढे बाकी आहे.

महापालिका निवडणुकीला फारसा कालावधी बाकी नाही. त्यावेळी भाजप-मनसे एकत्र येत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष परस्परांपासून दूर गेल्याचे अधोरेखीत झाले. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात. मनसेकडून तसा प्रस्ताव आला नसल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते सांगत असले तरी त्याची रंगीत तालीम मनसे चार वर्षांपासून पालिकेत करीत आहे. याच सुमारास महाविकास आघाडीत एकवाक्यता नसणे, भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची भाषा करतात. पण, शिवसेना वगळता शहरात राष्ट्रवादी, काँग्रेसची राजकीय ताकद त्या पक्षांच्या नेत्यांनाही ज्ञात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांवर नेत्यांचाही अंकुश राहिला नसल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

महापालिका निवडणुकीला केवळ सात ते आठ महिने बाकी आहेत. स्थायी सभापतीपदासाठी शिवसेनेचे पुरेसे संख्याबळ होत नाही. घोडेबाजार टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून या निवडणुकीत तटस्थ राहण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार शिवसेना तटस्थ राहणार आहे.

– अजय बोरस्ते

(विरोधी पक्षनेता, शिवसेना)