नाशिक महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील विविध भागांत गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. शहरातील सहा विभागांमध्ये २८ कृत्रिम तलाव तयार करण्यात आली असून गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमध्ये गणेश विसर्जनासाठी सहा विभागांत २६ नैसर्गिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी प्रशासनासह नाशिककर देखील सज्ज झाले आहेत.

शहरातील गोदावरी, वाघाडी, दारणा, वालदेवी, नासर्डी या प्रमुख नद्यांमध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात. बाप्पांच्या अनेक मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जात असल्याने त्या पाण्यात पूर्णतः लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे गोदावरीसह इतर नद्यांचे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे बाप्पांच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून या सर्व ठिकाणी मूर्ती संकलन देखील केले जाणार आहे. दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन या कृत्रिम तलावांत केले जाते. त्यामुळे गोदावरी आणि इतर नद्यांच्या संरक्षणासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिककरांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

कृत्रिम तलावांची ठिकाणे

नाशिक पूर्व : रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामीनगर बसस्टॉप, कलानगर चौक, शिवाजीवाडी पूल (नंदिनी नदीलगत), राजीवनगर- शारदा शाळेजवळ, साईनाथनगर चौफुली.

नाशिक पश्चिम : चोपडा लॉन्स, लायन्स क्लब पंडित कॉलनी, चव्हाण कॉलनी, महात्मानगर जलकुंभ, फॉरेस्ट नर्सरी, येवलेकर मळा, दोंदे पूल म्हसोबा मंदिराजवळ, पालिका बाजार.

सातपूर : सोमेश्वर मंदिर गंगापूर रोड, पाइपलाइनरोड, अशोकनगर, शिवाजीनगर.

सिडको : डे केअर स्कूल, राजे संभाजी स्टेडियम, पवननगर स्टेडियम, जिजाऊ वाचनालय.

पंचवटी : पेठ रोड आरटीओ कॉर्नर, कोणार्कनगर, दत्त चौक गोरक्षानगर.

नाशिकरोड : महापालिका शाळा क्रमांक १२३, जय भवानीरोड, जेतवननगर, नारायणबापू चौक, चेहेडी ट्रक टर्मिनल्स.

 

नैसर्गिक ठिकाणे

नाशिक पूर्व : शीतळादेवी मंदिर, लक्ष्मीनारायण पूल, टाळकुटेश्वर घाट, टाकळी संगम पूल.

नाशिक पश्चिम : यशवंत महाराज पंटागण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटागंण, घारपुरे घाट, हनुमान घाट.

पंचवटी : रामवाडी चिंचबन गोदापार्क, म्हसरूळ सीता सरोवर, राजमाता मंगल कार्यालय, नांदूर-मानूर गोदावरील पूल, तपोवन, कपीला संगम, रामकुंड परिसर.

नाशिकरोड : चेहडी दारणा घाट, वालदेवी नदी विहीतगाव, देवळाली गाव, वडनेर गाव पंपिंग स्टेशन, दसक घाट, दसक जेलरोड.

सातपूर : मते लॉन्स गंगापूररोड, आनंदवल्ली गावाजवळ, सोमेश्वर धबधबा, नासर्डी नदी (पपया नर्सरीजवळ), गणेश घाट औंदुबरचौक.

नवीन नाशिक : वालदेवी नदीघाट.

सीसीटीव्हीचा पहारा

भाविकांच्या सुरक्षेला प्राथमिकता देत दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पारंपरिक विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाकडी बारव, दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड येथे व विसर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिरवणुकीचे चित्रीकरण देखील केले जाणार आहे.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचे असेही करा विसर्जन
अमोनियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा) मोठ्या बादलीत किंवा एखाद्या भांड्यात पाण्यामध्ये मिसळवून त्यात मूर्तीचे विसर्जन केल्यास साधारण पाच-सहा दिवसांत मूर्ती पूर्णपणे विसर्जित होते. त्यामुळे नदीचे प्रदूषण तर होणार नाहीच परंतु लोकांना घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करता येणे शक्य आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीपासून होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून अमोनियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा) चे मोफत वितरण केले जात आहे. नाशिक महापालिकेने आरसीएफकडून ६ टन अमोनियम बायकार्बोनेट मागवलो आहे. महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमधून नागरिकांनी अमोनियम बायकार्बोनेट घेऊन जावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.