जी. व्ही. मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; पिस्तुलासाठी एक लाख ३० हजारची गरज

देशातील प्रसिध्द आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जी. व्ही. मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी नाशिकची नेमबाज अपूर्वा पाटील हिची निवड झाली आहे. व्यंगावर मात करत तिने मिळवलेले यश लक्षणीय असताना बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे तिचे स्वप्न आणि साधला जाणारा अचून नेम  अधांतरी राहिला आहे. या स्पर्धेसाठी तिला एक लाख ३० हजार रुपये किंमतीच्या पिस्तुलाची गरज आहे.

अपूर्वा जन्मत कर्णबधीर, हृदयाला छिद्र, वयाच्या अवघ्या ११ वर्षांत अपेंडीक्ससह ऐकूयेण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया. या साऱ्या वेदना हसतमुखाने स्वीकारत जिद्द आणि चिकाटीने नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत हिच्या हातातील पिस्तुल पाहुन मनात जागे झालेले अपूर्वाचे कुतूहल आज तिला राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करण्यापर्यंत घेऊन गेले. पण हा प्रवास सोपा नसल्याचे अपूर्वाची आई भाग्यश्री सांगते. अपूर्वा विशेष मुलगी असल्याने तिला समोरच्यांकडून नेहमीच दुय्यम वागणूक दिली गेली. तिला जन्मत हृदयाला तीन छिद्र होती. पहिल्या वर्षांत तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. सुदैवाने ती शस्त्रक्रिया टळली, पण ती कर्णबधीर असल्याचे लक्षात आल्याने त्या उपचारांचा ससेमिरा मागे लागला. विशेष मुलगी असल्याने तिची होणारी हेळसांड पाहून पालकांनी तिचा भोसला शिशु विहार मराठी माध्यमात प्रवेश घेतला. याच काळात तिला सहज ऐकता यावे यासाठी श्रवणयंत्र बसविण्याची शस्त्रक्रिया झाली. त्यात पालकांची मोठी आर्थिक पुंजी खर्ची पडली. शस्त्रक्रियेनंतर ऐकण्याची प्रकिया सोपी झाली. शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे तिच्यात शिकण्याची, जिंकण्याची, काही करण्याची उर्मी निर्माण झाली. लेखनाचा छंद जडलेली अपूर्वा स्वतची दैनंदिनी लिहिते. एक दिवस वर्तमानपत्रात अंजली भागवतच्या हातातील पिस्तुलाचे छायाचित्र पाहुन हे काय असते असे तिने विचारले. आईने या प्रश्नाकडे तिचे भविष्य म्हणून पाहिले. एक्सएल टार्गेट शुटींग संस्थेच्या प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांना भेटत तिला पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षण देण्याबाबत विचारणा केली. त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. सध्या अपूर्वा ही गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षभेदाचा सराव करत आहे. दररोज ठराविक वेळेचा सराव करताना तिने जलतरणसह नेमबाजीच्या विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चार सुवर्ण पदकांसह विविध पारितोषिके अपुर्वाने मिळवली आहेत.

नुकतीच तिची मावळणकर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठीच्या सर्व फेऱ्या तिने पूर्ण केल्या आहेत. मात्र याच कालावधीत तिच्यावरील कर्ण शस्त्रक्रियेत बसविलेले यंत्र बदलण्याची वेळ जवळ आली. यासाठी लागणारा खर्च, महिन्याकाठी स्पीच, मॅपिंगसह अन्य चाचण्या यासाठी होणारा खर्च तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वतचे पिस्तुल हा खर्च आवाक्याबाहेर असल्याने तिचे स्पर्धेत सहभागी होण्याचे भवितव्य अधांतरी बनले आहे. समाजातील दानशूर घटकांनी मदतीचा हात दिल्यास अपूर्वा स्वत:चे पिस्तुल घेऊन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकते.

ऑलिम्पिक स्पर्धा गाठायची आहे

आपल्याला ऑलिम्पिकमध्ये अपंगासाठी असलेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करायचे आहे. माझे आजारपण आणि शिक्षण याचा ताळमेळ बसविताना बाबा व आईची दमछाक होते. पण त्यांचे कष्ट मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात.

अपूर्वा पाटील (नेमबाज)

स्वप्न प्रत्यक्षात कधी साकार होणार ?

मला अपूर्वाच्या  व्यंगाचा कधीच त्रास झाला नाही. ती १३ महिन्यांची असल्यापासून उपचारासाठी वेगवेगळ्या संस्था, व्यक्तींची मदत घेण्यासाठी फिरफिर सुरू आहे. हे सर्व करायला उत्साह अपूर्वाची जिद्द देते. सर्वसामान्यांपेक्षा ती समजुतदार आहे. तिचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी केवळ भार वाहणारी आहे. प्रश्न इतकाच की हे स्वप्न प्रत्यक्षात कसे येणार?

भाग्यश्री पाटील (अपूर्वाची आई)