एक टन निर्माल्य संकलन; गणेशभक्तांना खत करण्याचे प्रात्यक्षिक

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने गंगापूर येथील धबधब्याजवळ ‘निर्माल्यातून फुलाकडे’ हा उपक्रम गणेश विसर्जनाच्या दिवशी राबविण्यात आला. निर्माल्य नदीत टाकण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी भाविकांना निर्माल्य संकलनाचे आवाहन करून त्यापासून खत कसे करता येईल, याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

‘निर्माल्यातून फुलाकडे’ उपक्रमाचे हे २३ वे वर्ष होते. निर्माल्य नदीपात्रात टाकल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आणि रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण

होते. हे टाळण्यासाठी निर्माल्य नदीपात्रात न टाकता त्यापासून खत कसे बनविले जाते, याची माहिती गणेशभक्तांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. यंदा एक टन निर्माल्य संकलन करून मनपाला देण्यात आले. तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांना निर्माल्यातून खत कसे तयार होते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

यावेळी संस्थेने दीड हजार मूर्तीही दान म्हणून स्वीकारल्या. संस्थेचे प्रा. आनंद बोरा यांनी निर्माल्य जर घराजवळील परसबागेत खड्डा करून त्यात टाकले आणि जिवंत गांडूळ त्यात सोडून ते बुजविल्यास महिन्यात उत्कृष्ट खत तयार होऊ शकते, असे सांगितले. घरातील भाजीपाला, उरलेले अन्नदेखील या खड्डय़ात टाकता येते. कुंडीतदेखील हा प्रयोग सहज करता येतो. मार्गदर्शनासाठी रमेश वैद्य, प्रमिला पाटील, अनिल निगळ, सागर बनकर दर्शन घुगे, सलोनी वाघमारे, आशीष बनकर आदींनी पुढाकार घेतला. यावर्षी गंगापूर गावातील मंदिरातदेखील हा प्रयोग करून दाखविण्यात आला. धबधब्याजवळील मारुती मंदिरातील दत्तगिरी महाराज यांना निर्माल्याने तयार केलेली गुलाबाची कुंडी भेट देण्यात आली.

निर्माल्यातून खत असे तयार होते

निर्माल्यातील फुलांपासून खत बनविता येते. मातीच्या कुंडीत तळाला एक छिद्र पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवावे. छिद्रावर विटाचा तुकडा ठेवावा. त्यानंतर बाजारात कोकोपीट मिळते. त्याला बारीक करून एक थर द्यावा. त्यानंतर घरातील निर्माल्यात जमा झालेली फुले मोकळी करून त्या कुंडीत टाकावी. नंतर गांडूळ खत टाकून त्यावर रोप ठेवून पुन्हा  निर्माल्य टाकून पुन्हा कोकोपीटचा थर द्यावा. दर आठ दिवसांनी थर वरच्यावर हलवत राहावे. निर्माल्यामध्ये केवळ फुलांचाच वापर करावा. रासायनिक वस्तू वापरू नये. कुंडी सूर्यप्रकाशात ठेवावी. माती न वापरता केवळ निर्माल्य, कोकोपीट आणि गांडूळ खतातून गच्चीवर फुले फुलविता येतात.