24 January 2019

News Flash

रविवारी पक्ष्यांच्या शाळेची पहिली घंटा

यंदा शाळा शहर परिसरातील गोंगाटापासून दूर अशा मखमलाबाद कालव्याजवळ असलेल्या फार्म हाऊसवर भरणार आहे.

नेचर क्लब ऑफ नाशिकचा उपक्रम

यंदाही उन्हाळी सुटीत पुन्हा एकदा पक्ष्यांची शाळा गजबजणार आहे. दीर्घ सुटीत रविवारी पक्ष्यांच्या शाळेत पहिली घंटा वाजल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळेल. त्यानिमित्ताने शैक्षणिक साहित्याची जुळवाजुळव करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा शाळा शहर परिसरातील गोंगाटापासून दूर अशा मखमलाबाद कालव्याजवळ असलेल्या फार्म हाऊसवर भरणार आहे.

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने तीन वर्षांपासून ‘पक्ष्यांची शाळा’ हा अनोखा उपक्रम उन्हाळ्याच्या सुटीत राबविण्यात येतो. मुलांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी, पशू-पक्ष्यांची त्यांना माहिती व्हावी, या हेतूने पक्ष्यांची ही शाळा भरविण्यात येते. संस्थेने मागील वर्षी शहर परिसरात ‘चला पक्षी मोजू या’ हा उपक्रम राबवत शहरात कोणते पक्षी आढळतात, याची माहिती घेतली होती.

जंगल परिसरात राहणारे पक्षी आता मानवी वस्ती असलेल्या भागात राहण्यासाठी येत आहेत. पर्यावरणाची साखळी खंडित होण्याची ही लक्षणे असून याचा अभ्यास करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच हे वर्ग शहराच्या मुख्य वस्तीपासून दूर असलेल्या मखमलाबाद कालवा परिसरातील एका फार्म हाऊसवर भरविण्यात येणार आहे.

पक्ष्यांच्या शाळेसाठी लागणारे साहित्य ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेवर तयार करण्याचे काम सुरू आहे. उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.  सध्या पक्ष्यांच्या शाळेसाठी लागणारे साहित्य जमविण्याचे काम सुरू असून फेकलेले टायर, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, टब आदी सामानापासून पक्ष्यांचा निवारा, त्यांना खाद्य ठेवता येईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. पक्ष्यांना लागणारे खाद्यही संकलीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी दिली.

गवताळ, शिकारी, पाणपक्षीचा अभ्यास

मखमलाबाद भागात गवताळ, शिकारी तसेच पाणपक्षी गटातील पक्ष्यांची संख्या लक्षणीय राहणार आहे. सध्या गवताळ प्रकारातील मुनिया, हुदहुद, स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांसह शिकारी गटातील शिकारा, गरुड आणि हळद्या हे पक्षी दिसत आहेत. पोपटांची वस्ती या भागात आहे. वास्तविक मुनिया काही वर्षांपासून शहराच्या मुख्य वस्ती परिसरात दिसत आहे. वाढते सिमेंटचे जंगलीकरण यास कारणीभूत आहे की अन्य काही कारणे याचा अभ्यास ‘पक्ष्यांच्या शाळेत’ होणार आहे. रविवारपासून पहिल्या पावसाच्या आगमनापर्यंत ही शाळा नियमितपणे सकाळी आठ ते १० या वेळेत भरणार आहे.

First Published on April 12, 2018 2:16 am

Web Title: nature club of nashik bird school