नेचर क्लबचे सर्वेक्षण

थंड हवेचे शहर अशी ओळख असणाऱ्या नाशिक शहराचा विकास वेगाने होत आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमीपर्यंतच्या प्रवासात शहरातील झाडांची संख्या कमी होऊन सिमेंटचे जंगल वाढू लागले आहे. त्यातच विद्युत तारा तसेच नायलॉन मांजा यांचा धोका असल्याने परिणामी गोदाकाठासह शहराच्या मध्यवर्ती भागातून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येणे आता बंद झाले आहे, ही बाब नेचर क्लब ऑफ नाशिकच्या ‘पक्षी मोजू या..’उपक्रमातंर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली आहे.

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने दरवर्षी आठ दिवस शहर परिसरातील विविध भागांमध्ये फिरून पक्ष्यांच्या अधिवासाबद्दल  निरीक्षण केले जाते. मागील वर्षी गाडगे महाराज धर्मशाळा परिसरात बगळे आढळले होते. यंदा मात्र ते मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. त्यांच्याऐवजी ‘नाईट हेरॉन’ ची संख्या वाढत आहे. या परिसरात शेकडोंच्या संख्येने दिसणाऱ्या साळुंक्याचा थवाही दिसेनासा झाला आहे. अमरधाम परिसरात मागील वर्षी ३० वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहण्यात आले होते. या वर्षी नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याने केवळ आठ प्रकारचे पक्षी बघावयास मिळाले. परिसरातील विद्युत मनोऱ्यांवर घारींनी घरटे तयार केले आहे. शहरातील विद्युत तारांवर मोठय़ा प्रमाणात पतंगीचा मांजा लटकलेला असल्याने अनेक पक्षी उडताना जायबंदी होतात. महापालिकेने मांजा हटाव मोहीम राबविणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, विकासाच्या तसेच बांधकामाच्या नावाखाली शहरात मोठय़ा प्रमाणात देशी वृक्ष तोडल्यामुळे अनेक पक्ष्यांनी इमारतींवर घरटी तयार करण्यास सुरुवात केली आहे. पोपटांनी तर इमारतींच्या छिद्रांचा आधार घेत आपले बिऱ्हाड त्यात हलविले आहे. गोदापार्कलगत  मोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने तेथील आवाज, माणसांचा सातत्याने वावर, यंत्रांचा खडखडाट, धुळीसह अन्य प्रदूषणामुळे अनेक पक्ष्यांनी येथून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. खंडय़ा, शराटी, ग्रे हेरॉन, मध्यम बगळा, पाणकोंबडय़ा, तितर यांचा त्यामध्ये समावेश आहे.

बदलत्या परिस्थितीला आपलेसे करणाऱ्या कबुतरांची संख्या मात्र शहरात वाढत आहे. बहुतांश इमारतींमध्ये कबुतरांनी आपले घरटे थाटले असून त्यांची संख्या कमालीची वाढली आहे. यावर नियंत्रण कसे मिळवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.  पक्ष्यांच्या संवर्धनाचा विचार न झाल्यास भविष्यात अनेक निसर्ग संकटांना नाशिककरांना तोंड द्यावे  लागेल, असा इशारा नेचर क्लबच्या वतीने देण्यात आला आहे. या उपक्रमात मात संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा, पक्षीमित्र उमेश नागरे, भीमराव राजोळे, मनोज वाघमारे, प्रमिला पाटील, सागर बनकर, आकाश जाधव आदींनी सहभाग घेतला.

शहरातून स्थलांतराकडे पक्ष्यांचा कल

शहरांमधील वाढते प्रदूषण, मोठय़ा गृहप्रकल्पांमुळे पक्ष्यांच्या निवास स्थानांवर गंडातर आले आहे.  वाढत्या शहरीकरणाचा फटका पक्ष्यांना बसत आहे. अनेक पक्षी मासेमारीची जाळी, नायलॉन मांजा यामध्ये अडकत आहेत. यामुळे गोदाकाठासह अन्य परिसरातून बहुतांश पक्षी काढता पाय घेऊ लागले आहेत. बंगले, चाळी आणि वाडय़ांची जागा आता मोठय़ा इमारतींनी घेतल्याने चिमण्या, बुलबुल, सूर्यपक्षी, पोपट, मैना, कोकीळ आदी पक्षी संकटात सापडले आहेत. गव्हाणी घुबडास लोकांच्या अंधश्रद्धेचा बळी व्हावे लागत आहे. नदीतील मासेमाऱ्यांच्या जाळ्यात अनेक पक्षी अडकून मृत्युमुखी झाल्याचे पाहण्यास मिळाले. सातपूरमध्ये गिधाडालाही अशा प्रकारे मरणाला सामोरे जावे लागले. पक्ष्यांची कॉलनी गृह प्रकल्पांमुळे संकटात सापडली आहे.