25 March 2019

News Flash

गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी नववर्ष स्वागत समिती सज्ज

नववर्षांच्या स्वागतासाठी स्वागत समिती सज्ज झाली आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी स्वागत समिती सज्ज झाली आहे.

 स्वागत यात्रा, महावादन, लघुपट महोत्सव कार्यक्रमांची रेलचेल

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षांचे स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने यंदा स्वागत यात्रा, महावादन, लघुपट महोत्सव यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी स्वागत समिती सज्ज झाली आहे.

हिंदू नववर्षांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत व्हावे, यानिमित्ताने समस्त हिंदू समाज संघटित व्हावा यासाठी स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महावादन, महारांगोळी असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यंदा ‘सेवा’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ, महारांगोळी काढण्यात येणार आहे. १२ मार्च रोजी रविवार कारंजा यात्रा समितीच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता शौनक गायधनी यांच्या सहकार्याने शंकराचार्य न्यास येथे लघुपट महोत्सव होणार आहे. नववर्ष स्वागताचा उत्साह कायम राहावा यासाठी समितीच्या वतीने ‘नाशिक ढोल’चा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे.

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक ढोल वादनाची परंपरा यंदाही कायम असून जिल्ह्य़ातील २० ढोलपथके १४ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोदाकाठावरील यशवंतराव महाराज पटांगणावर एकत्र येत ढोल वादन करणार आहेत. यामध्ये एक हजार वादक सहभागी होणार असून ताल, त्रितालाच्या आरोह-अवरोहात शंख, ध्वनी, ताशा, झांजाचा आवाज घुमणार आहे. यामध्ये ध्वजाच्या कसरती पाहायला मिळतील. यंदाचे महावादन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित आहे. महावादनाची जबाबदारी रोहित गायधनी सांभाळणार असून शहर परिसरातील नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

हिंदूू नववर्षांच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १८ मार्च रोजी गुढीपाडव्याला रविवार कारंजा आणि पंचवटी भागातून सकाळी सहा वाजता दोन स्वागत यात्रा काढण्यात येणार आहेत. रविवार कारंजा परिसरातून निघणाऱ्या यात्रेस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्ण महासंघाचे पदाधिकारी गिरीश टकले, अ‍ॅड. नितीन ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता साक्षी गणपती मंदिरापासून यात्रा सुरू होणार असून चांदवडकर लेन मार्गे दिल्ली दरवाजाकडून भाजी बाजारात यात्रेचा समारोप होईल. यंदा यात्रेत एक किलोमीटरची रांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच सेवा या विषयाला अनुसरून विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांचे १५ चित्ररथ यात सहभागी होणार आहेत. याशिवाय ढोल वादन, मंगळागौरीचे खेळ, महिला दुचाकी फेरी यांसह शारीरिक कसरती दाखविल्या जाणार आहेत. पंचवटी विभागातून श्रीकाळाराम मंदिर परिसरात गुढीपूजन होऊन सात वाजता यात्रेची सुरुवात होईल. गणेशवाडीमार्गे पेठ नाका, रामकुंड परिसर असा यात्रा मार्ग राहील. यात्रा भाजी बाजार परिसरात येतील. यात्रेत रांगोळ्यांनी मार्ग सुशोभित केला जावा यासाठी स्थानिक गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. यात्रेत महिलांचे एक समूह लेझीम सादरीकरण होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून दंड युद्धाचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल.

महारांगोळीचे आकर्षण

१६ मार्च रोजी २५० बाय १०० अशी २५००० स्क्वेअर फूट आकारातील महारांगोळी आकारास येणार आहे. गोदाकाठावर ‘गो-सेवा’ या संकल्पनेवर हा विषय रांगोळीच्या माध्यमातून आकारास येत आहे. गोसेवेचे पैलू रांगोळीतून समोर येणार असून यासाठी ५०० महिला प्रयत्न करणार आहेत. त्यांचा सायंकाळी विशेष सत्कार करण्यात येईल. यंदा ही रांगोळी गोदा किनाऱ्यापुरती मर्यादित नसून तिचे प्रतिबिंब शहरातील सातही विभागांत उमटणार आहे. रांगोळीची जबाबदारी रांगोळीकार नीलेश देशपांडे यांची आहे. इंदिरानगर येथे मोदकेश्वर मंदिर परिसरात ग्रामसेवा, मुंबई नाका परिसरातील कालिका मंदिर येथे पर्यावरण, नाशिकरोडच्या मुक्तीधाम येथे संस्कार, आडगाव येथे वीर सावरकर स्मारकमध्ये राष्ट्रसेवा, सिडको येथील पेठे हायस्कूलमध्ये शिक्षण, गंगापूर रोड येथील श्रीगुरुजी रुग्णालयात आरोग्य, तर पाथर्डी फाटा येथील मुरलीधर गामणे क्रीडांगण आणि जॉगिंग ट्रॅक येथे सजीव सेवा या विषयावर महारांगोळी काढण्यात येणार आहे.

First Published on March 13, 2018 3:34 am

Web Title: nav varsh swagat samiti ready to welcome gudi padwa