कोल्हापूर, सांगलीतील बचावकार्यात सहभागी पथकांचा अनुभव

अनिकेत साठे, नाशिक

‘‘कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम होणाऱ्या सैनिक टाकळी, राजापूर, मजरेवाडी, औरवाड, नरसोबाची वाडी, बुबनाळ परिसरात नौदल वगळता इतर पथके जाण्यास तयार नव्हती, कारण तिथे प्रवाह अतिशय वेगात होता. राजापूरमध्ये अडकलेल्यांना रबरी बोटीतून त्या प्रवाहातून बाहेर काढणे जोखमीचे होते; पण त्याशिवाय पर्याय नव्हता. बोटीत पाणी शिरत होते. या स्थितीत पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर नेण्यात आले. अनेक ठिकाणी पाच ते सात किलोमीटरचे अंतर बोटीतून पार करावे लागले. क्षमतेहून अधिक लोकांची वाहतूक करावी लागली. मजरेवाडीवरून नरसोबाच्या वाडीला जाताना त्यापेक्षा वेगात प्रवाह होता. तिथे अडीच टन मदत साहित्य बोटीतून पोहचवताना कठीण स्थिती हाताळावी लागली..’’

कोल्हापूर, सांगली येथील महापुरातील बचावकार्यात सहभागी झालेल्या पथकातील अधिकारी, खलाशांची ही प्रतिक्रिया. नौदलाच्या सर्वच पथकांनी अशा संकटांना तोंड देत पूरग्रस्तांना जीवदान देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

नौदलाची ५० हून अधिक पथके या कामात सहभागी झाली. त्यात मुख्यत्वे पाण्यात अधिक काळ तगून राहण्याचे (पाणबुडे म्हणजेच ‘डायव्हर’) विशेष प्रशिक्षण घेणाऱ्या २०० पेक्षा अधिक अधिकारी, खलाशांचा समावेश आहे. प्रतिकूल हवामान, नद्यांनी गाठलेली धोकादायक पातळी यांचा सामना करत लहानशा रबरी बोटीच्या साहाय्याने त्यांनी बचाव अन् मदतकार्यात अक्षरश: झोकून दिले. यामध्ये आयएनएस तानाजी, आयएनएस वज्रबाहू, आयएनएस तंत्रा, आयएनएस अभिमन्यू आदी युद्धनौकांवरील पथकांचा अंतर्भाव आहे. गोवा, विशाखापट्टणम येथूनही काही पथके सांगली, कोल्हापूरमध्ये दाखल झाली. पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यानंतर आता त्यांच्यामार्फत मदत सामग्री पोहोचविली जात आहे. सलग सहा ते सात दिवस राबविलेल्या बचावकार्याचे अनुभव नौदल अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’कडे मांडले. सुरुवातीला महापुरात लोक मोठय़ा प्रमाणात अडकले होते. तीन-चार दिवस पिण्याचे पाणी, भोजनाअभावी त्यांची अवस्था बिकट झाली होती. यामुळे लहान मुले, वृद्ध, महिलांना प्रथम सुरक्षित स्थळी नेण्यास प्राधान्य दिले गेले. या मोहिमेने नौदल, हवाई आणि लष्कराच्या संयुक्त कार्यवाहीचे दर्शन घडविले. अर्थात, त्यास एनडीआरएफ, शासन, प्रशासन, स्थानिक युवकांचे साहाय्य लाभल्याचे नौदल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नौदलाच्या प्रत्येक पथकात अधिकारी, तीन पाणबुडे असा चार जणांचा समावेश आहे. रस्त्यांवरील बचावकार्य आणि पाण्यातील बचावकार्य यात गतिमानतेत फरक पडतो. रबरी बोट, तिचे छोटेखानी इंजिन, ध्वनिक्षेपक, पायाने हवा भरता येणारा पंप, लाइफ जॅकेट, पेट्रोल असे सर्व साहित्य घेऊन प्रत्येक पथक कामाला भिडले. यामध्ये आयएनएस तानाजीवरील लेफ्टनंट सुभाशीष पूंज यांच्या नेतृत्वाखाली अनिलकुमार, रजतकुमार, यू. पी. पोगल यांच्याही पथकाचा समावेश आहे. कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर ते पहिल्यांदा शिवाजी पुलावर गेले.

गोव्याच्या पथकासोबत त्यांनी संयुक्त मोहीम राबविली. नंतरचे तीन दिवस त्यांच्यासह इतर पथकांनी चिखली गावातून दोन ते अडीच हजार लोकांना बोटीतून सुरक्षित स्थळी नेले. सैनिक टाकळीतून राजापूरसाठीची बचाव मोहीम पथकांची परीक्षा पाहणारी होती. प्रवाह वेगाने वाहत होता.

सैनिक टाकळीतून एका बाजूने सात किलोमीटर अंतर पार करायचे होते. नागरिकांना घेऊन परतताना बोटीत पाणी शिरत होते. ते बाहेर काढण्याचे काम करावे लागले. तेव्हा अवघड परिस्थिती हाताळावी लागल्याचे सदस्यांनी सांगितले. अंतर जास्त असल्याने एका पथकास मर्यादा आल्या. मुंबईहून नव्याने आलेल्या पाच पथकांनी तीन दिवस त्या भागात बचाव मोहीम राबविली.

कृष्णा, पंचगंगेचा संगम असणाऱ्या मजरेवाडी, नरसोबाची वाडी, औरवाड, बुबनाळ परिसरांत इतर पथके जाण्यास तयार नव्हती. लष्करासह एनडीआरएफच्या पथकाने असमर्थता व्यक्त केली. तिथे नौदलाचे पथक धडकले. सोमवारी त्या भागात मदत साहित्य पोहोचविताना नौदल पथकाला धोकादायक प्रवाहातून मार्गक्रमण करावे लागल्याचा अनुभव अधिकाऱ्यांनी सांगितला. सुमारे अडीच टन साहित्य बोटीतून तिथे पोहोचविले गेले.

नौदल पथकाकडील रबरी जेमिनी बोटीची क्षमता ८०० किलो आहे. म्हणजे साधारणत: आठ व्यक्ती; परंतु बचावकार्यात अधिकतम पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी अनेकदा क्षमतेहून अधिक वाहतूक करावी लागली. त्या वेळी अधिकारी, खलाशांना आजवरचा अनुभव कामी आला.

बचावकार्याचे विशेष प्रशिक्षण

नौदलाचे कोचीन येथे पाणबुडे अर्थात ‘डायव्हिंग’चे प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे नऊ महिन्यांत पाण्याखाली, समुद्रात लांब अंतर पोहणे, प्राणवायू, अन्न-पाण्याविना अधिक काळ पाण्यात तगून राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात पूरस्थितीची हाताळणी याचाही अंतर्भाव असतो. नौदलाकडे हवाई दल, युद्धनौकेवरील असे दोन प्रकारचे पाणबुडे आहेत. संबंधितांना त्या त्या विषयांत विशेष प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे नौदलाच्या हवाई दलातील खलाशी पाण्याखाली काम करण्याची क्षमता राखतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेगवान प्रवाहाचे आव्हान स्वीकारत नौदलाच्या पथकांनी बचावकार्य केले. मदत सामग्री पोहोचविताना बोटीत इतर लोक नसल्याने जोखीम कमी होती; परंतु काही ठिकाणी पूरग्रस्तांना घेऊन सात किलोमीटरचे अंतर बोटीने कापावे लागले. चिखली येथे बचावकार्यावेळी एक बोट ‘पंक्चर’ झाली. स्थानिकांच्या सहकार्याने ती दुरुस्त करत लगेचच काम सुरू करण्यात आले.

– लेफ्ट. सुभाशीष पूंज (आयएनएस तानाजी)