X

यात्रोत्सवात दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद

यात्रोत्सवात सहभागी होताना नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाची सर्वत्र धूम असताना शहराचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिर यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होत आहे. या गर्दीचा लाभ उठवत यात्रोत्सवात भुरटय़ा चोऱ्यांसह सोनसाखळीसह दागिने ओरबाडण्याचे प्रकार घडत आहे. या प्रकारांमध्ये सक्रिय असणाऱ्या औरंगाबाद येथील महिलांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. यात्रोत्सवात सहभागी होताना नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कालिका मंदिर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मुंबई नाका ते त्र्यंबकनाका परिसरात दुतर्फा विविध दुकानांसह रहाट पाळणे व तत्सम खेळण्याची दुकाने लागली आहेत. कालिका दर्शन आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी भाविकांची दिवसागणिक गर्दी वाढत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त आहे. परंतु, भुरटय़ा चोरटय़ांसह सराईत गुन्हेगार गर्दीचा फायदा घेत आपले हस्तकौशल्य दाखवत आहेत. याच गर्दीत औरंगाबाद येथील महिलांची टोळी सक्रिय असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गर्दीचा फायदा घेत सावज हेरायचे, पुढील व मागच्या बाजूने कोंडीत पकडत धक्के देत नकळत त्याच्याकडील चीज वस्तू  अथवा दागिने लंपास करायचे ही या टोळीची कार्यपध्दती. यामधून लहान मुलेही सुटली नाही. त्यांच्या अंगावरील दागिने टोळीने लुटले. यात्रोत्सवात आलेल्या अश्विनी पवार यांच्या गळ्यातील २० हजार किंमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तर सीमा राठोड यांच्या मुलाच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान लंपास झाले. या प्रकरणी संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मंगळवारी दुपारपासून पोलीस गर्दीतील हालचालींवर नजर ठेवून होते. पोलिसांच्या सापळ्यात बुधवारी रात्री संशयित कविता पवार (३०), सोनाली भोसले (२५), बालिका काळे (२३) आणि राधा काळे (२२) सापडल्या. यातील कविता व सोनाली या गर्भवती आहेत. चार महिलाची ही टोळी औरंगाबादची आहे. त्यांच्या ताब्याचा विषय आल्याने पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर करत कोठडीची मागणी केली.

Outbrain