20 February 2019

News Flash

घोटी-सिन्नर महामार्गावरील खड्डय़ात घटस्थापना

निवेदनानंतर १५ दिवस उलटूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

जिजाऊ ब्रिगेडच्या दुर्गावतारानंतर दुरुस्ती सुरू

घोटी-सिन्नर महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाल्याने रस्तादुरुस्तीविषयी आधी इशारा देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडने नवरात्रीच्या पहिल्याच माळेला रस्त्यावरील खड्डय़ांचे पूजन करून त्यात घटस्थापना करून प्रशासनाचा निषेध केला. या अनोख्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. पोलीस आणि प्रशासनाने चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

घोटीपासून इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारा सिन्नपर्यंतचा महामार्ग अनेक महिन्यांपासून खड्डय़ांच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे काही अपघातही झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर जिजाऊ ब्रिगेडने प्रशासनाला नवरात्रीपर्यंत रस्त्याची डागडुजी न झाल्यास पहिल्याच माळेला आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. या संदर्भात इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले होते.

निवेदनानंतर १५ दिवस उलटूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. बुधवारी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे, जिल्हा कार्याध्यक्षा कांचन दिघे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी रस्त्यातील खड्डय़ांचे पूजन करून खड्डय़ात घटस्थापना केली.  महामार्गावर अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. घोटी पोलिसांनी तत्काळ साकूर फाटा परिसराकडे धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्या ठिकाणी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलक ठाम असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीस तातडीने सुरुवात करण्यात आली. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

First Published on October 11, 2018 1:50 am

Web Title: navratri ghat installation on the ghoti sinnar highway