News Flash

सप्तशृंगी गडावर शारदीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून ते मोकळे होणे आवश्यक आहे.

 

नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर होणाऱ्या शारदीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेसाठी मोठय़ा संख्येने भाविक येणार असल्याने रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. यावेळी यात्रोत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना, गडाच्या पायथ्याशी १६ एकरचा वाहनतळ, २८० जादा बसेसचे नियोजन, सुरक्षा व्यवस्थेसाठी सुमारे ५५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तैनाती आदींची माहिती सप्तश्रृंगी गडावर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत देण्यात आली.

यावेळी तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक संजय घाटगे, आगार व्यवस्थापक ए. आर. अहिरे, ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहितोंडे, वैद्यकीय अधिकारी आर. एम. सपकाळे आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून ते मोकळे होणे आवश्यक आहे. दुकानांवर जाळी, कापड लावण्यास प्रतिबंध करावा, यात्रोत्सवादरम्यान रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन रस्त्यावरून जाऊ  शकेल, याची दक्षता घ्यावी, तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक दलाचे स्वयंसेवक तैनात करण्यात करावे असे स्वामी यांनी सूचित केले. तलाव परिसरात प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा सुरळीत राहील यासाठी जोडण्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. शनिवारपासून गडावर सुरू होणाऱ्या यात्रोत्सवात दररोज ४० ते ५० हजार भाविक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करत असून आरोग्य सुविधेसाठी २० खाटांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे. १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३२ इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत पुरेसा औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह दोन उप अधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक, २५९ पोलीस कर्मचारी आणि २५० हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार आहेत. अग्निशमन दलाची दोन वाहने तयार ठेवण्यात आली असून सुरक्षेच्यासाठी हॉटेल्सची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील.

नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्यापाशी नांदुरी गाव येथे १६ एकर जागेवर वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी मार्गदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहे. एसटी महामंडळातर्फे २८० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. बस सुविधेसाठी गड आणि पायथा येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी पाच तंत्रज्ञ आणि एक क्रेनही सज्ज ठेवण्यात येईल.

नाशिकमध्ये कालिकोत्सवाचे नियोजन

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्पात आली आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाच्यावतीने मुख्य मंदिर, गाभारा तसेच सभोवतालचा परिसर या ठिकाणी २४ सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या शिवाय ५० महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह २५० पोलीस दिवसरात्र कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहेत. ५० खासगी सुरक्षा रक्षकांसह दोनशे स्वयंसेवक मंदिराची सुरक्षितता सांभाळणार आहेत. मुंबई नाका पोलिसांच्यावतीने परिसरात गस्त घातली जाणार असून या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीचे नियोजन सुरू आहे. उत्सवकाळात परिसरातील स्वच्छतेसाठी ४० महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, यंदा ट्रस्टने भाविकांनी आणलेले नारळ देवी चरणावर वाढविण्यासाठी दोन यंत्र विकत घेतली आहेत. तसेच भाविकांचा दोन कोटींचा विमाही काढण्यात आल्याची माहिती विश्वस्त अण्णा पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2016 12:56 am

Web Title: navratri preparation in saptashrungi fort
Next Stories
1 वाहतूक कोंडीत ‘गोळे’ कॉलनी
2 गुन्हे वृत्त : २८ लाखांच्या भंगार मालाचा चालकाकडून अपहार
3 शासकीय अनास्थेमुळे दौरा रद्द
Just Now!
X