महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतल्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. महापालिकेवर सत्ता मिळवल्यानंतर भाजपच्या मनमानी कारभाराला सुरूवात झाल्याचा आरोप करीत शुक्रवारी विविध प्रश्नांवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘जबाब दो’ मोर्चाद्वारे महापालिकेवर धडक देऊन जाब विचारला. यावेळी ठिय्या देऊन अनागोंदी कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात गर्दी जमविण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बरीच कसरत केली.

बी. डी. भालेकर मैदानापासून निघालेला हा मोर्चा महापालिकेवर धडकला. मोर्चेकऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत सत्ताधारी भाजपच्या अनागोंदी कारभारा विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. जनतेची दिशाभूल करत अनेक खोटी आश्वासने देत भाजपने राज्यासह नाशिकमध्ये महापालिकेची सत्ता हाती घेतली. ‘मी लाभार्थी’च्या नावे फसव्या जाहिराती प्रसारित होत असून त्यावर तीन हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ताटकळत ठेवताना जाहिरातीसाठी पैसा कुठून येतो, असा प्रश्न कोते पाटील यांनी केला.

काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात नाशिकचे पालकत्व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे होते. तेव्हा शहरात कोटय़वधींची विकास कामे झाली. आता मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची अवस्था बिकट झाली आहे. महापालिका निवडणुकीत  शहरात उड्डाणपूल, स्वतंत्र वाहनतळ,  शहर बससेवा, पर्यटनस्थळे विकास, क्रीडा प्रबोधिनी, आय.टी.हब, रुग्णालय, गोदावरी प्रदूषणमुक्ती, वैद्यकीय महाविद्यालये अशी अनेक आश्वासन दिली गेली होती. आता त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दत्तक नाशिकची बिकट अवस्था असल्याने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा जाब मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. महापालिकेचा कारभार सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. नाशिककरांची सेवा करण्यासाठी सत्तेवर आलेल्या भाजपचे नागरिकांची सेवा करण्यापेक्षा मेवा कसा मिळेल, याकडे अधिक लक्ष असल्याची टीका पालिका गटनेते गजानन शेलार यांनी केली.

मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गोदा प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे, गोरगरिबांना घरे मिळालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला आघाडीच्या प्रमुख प्रेरणा बलकवडे, अर्जुन टिळे, कविता कर्डक अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.