* चारही सभापतीपदांवर भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व * सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की

अतिशय काठावरील बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस आघाडीला विषय समिती सभापती निवडणुकीत धक्का देण्यात विरोधी भाजप व राष्ट्रवादी आघाडीला यश मिळाले. काँग्रेसचे तीन सदस्य विरोधकांना जाऊन मिळाल्यानंतर व्हीप बजावण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी सेना-काँग्रेसच्या सदस्यांनी सभेत गोंधळ घातला. यावेळी सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. निवडणुकीचे काम ठप्प झाल्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. निवडणूक अधिकाऱ्यांनी पक्षादेश बजावण्यास नकार देत निवडणूक प्रक्रिया राबविल्याने सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालून निवडणुकीचे कामकाज रोखले. काँग्रेसने सभात्याग केला. बंदोबस्तात पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवत विरोधकांनी विषय समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण सभापती तसेच सभापती क्रमांक एक व सभापती क्रमांक दोन अशा चार सभापतीपदांसाठी बुधवारी अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे माकपची भूमिका महत्वाची ठरणार अशी चर्चा असताना विरोधकांनी सत्ताधारी आघाडीतील नाराजांना गळाला लावण्याची व्यूहरचना केली होती. आधीच्या निवडणुकीत जो चमत्कार घडला नाही, तो चमत्कार विषय समित्यांच्या निवडणुकीत घडवत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी सेना-काँग्रेसने आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता होत नसल्याने असणारी अस्वस्थता या निवडणुकीत उफाळून आली. काँग्रेसच्या सुनिता चारोस्कर, शोभा कडाळे व अशोक टोंगारे हे सदस्य विरोधी भाजप व  राष्ट्रवादीला जाऊन मिळाले. सभागृहातील या घडामोडी लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या सदस्यांना पक्षादेश बजावू देण्याचा आग्रह धरला. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रक्रिया सुरू झाली असल्याने त्यास नकार दिला. यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. सेना व काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने निवडणूक प्रक्रियेचे काम ठप्प झाले. सभागृहातील एकंदर स्थिती लक्षात घेऊन बगाटे यांनी पोलिसांना पाचारण केले. बराच वेळ सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

काँग्रेसचे सदस्य फुटल्याने काठावरचे बहुमत असलेल्या सत्ताधारी गोटात अस्वस्थता पसरली. अखेरीस काँग्रेस सदस्यांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला. नंतर थांबलेली प्रक्रिया उशिराने पुन्हा सुरू झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अयशस्वी झालेली रणनिती विषय समित्यांच्या निवडणुकीत यशस्वी करत भाजप व राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधाऱ्यांना दणका दिला. चारही विषय समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित करत जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळविण्याचा सेना-काँग्रेस आघाडीचा आनंद औट घटकेचा ठरला. हात उंचावून झालेल्या मतदानात समाज कल्याण सभापतीपदी काँग्रेसच्या बंडखोर सुनिता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अर्पणा खोसकर, सभापती क्रमांक एक भाजपच्या मनिषा पवार आणि सभापती क्रमांक दोनवर राष्ट्रवादीचे यतिन पगार हे विजयी झाले. सत्ताधाऱ्यांना झटका देण्यात विरोधक यशस्वी झाल्याने जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणूक प्रक्रियेवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. सदस्य फुटल्यामुळे सभागृहात धक्काबुक्की झाल्याच्या तक्रारी काही सदस्यांनी केली.