News Flash

पालिकेसाठी काँग्रेसचे राष्ट्रवादीशी आघाडीचे संकेत

बनावट नोटा छपाई प्रकरणात छबु नागरेच्या माध्यमातून नाशिकमध्ये नवीन तेलगी समोर आला.

भाई जगताप यांचा आशावाद

बनावट नोटा छपाई प्रकरणात छबु नागरेच्या माध्यमातून नाशिकमध्ये नवीन तेलगी समोर आला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला पक्षातून तातडीने काढून टाकत त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती करावी की नाही, याबद्दलचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आ. भाई जगताप यांनी सांगत आघाडीची आशा कायम असल्याचे संकेत दिले. समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबद्दलचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले आहेत. तथापि, जातीय, धर्मवादी आणि प्रांतवादी भूमिका घेणाऱ्या पक्ष वा संघटनांसमवेत युती वा आघाडी केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबु नागरेला रद्दबातल झालेल्या नोटांची बनावट छपाई प्रकरणात अटक झाली. स्वत:च्या सदनिकेत नागरे या नोटांची छपाई करत असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेआधी नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना अटक झाली होती. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचे सांगत महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत पुनर्विचार केला जाणार असल्याचे म्हटले होते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर जगताप यांनी उपरोक्त घटनांमुळे काँग्रेसमध्ये आघाडीबाबत निश्चितपणे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे मान्य केले. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना आपले पैसे बँकेतून काढणे अवघड बनले आहे. या स्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे दुसऱ्या तेलगीसारखे उद्योग समोर आले. तथापि, राष्ट्रवादीने तातडीने कारवाई करत नागरेला पक्षातून काढून टाकल्याचे जगताप यांनी नमूद केले. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी आघाडी करावी, असे बहुतांश स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधितांना आहे. परंतु, प्रांतवादी भूमिका घेणारे मनसे असो वा इतर जातीय पक्ष यांच्याशी कोणत्याही स्थितीत आघाडी केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नोटाबंदीविरोधात देशव्यापी थाळीनाद

नोटाबंदी हा पंतप्रधानांचा सर्वाधिक मोठा घोटाळा असून  निर्णयाची जबाबदारी घेऊन त्यांनी देशाची माफी मागावी, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. ६ जानेवारी रोजी काँग्रेसचे पदाधिकारी स्थानिक प्रशासनाला या निर्णयाविरोधातील नाराजी निवेदनातून व्यक्त करतील आणि ८ जानेवारी रोजी जिल्ह्यत थाळीनाद आंदोलन करण्यात येईल. पंतप्रधानांच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले होते. तथापि, त्याच्या अंमलबजावणीतील फोलपणा तीन ते चार दिवसात समोर आला. नाशिकच्या आदिवासीबहुल भागातील ठाणेपाडा येथे बँकेतून पैसे काढण्यासाठी लागणारी चिठ्ठी १० ते २० रुपये घेऊन विकली जात आहे. आदिवासी बांधवांच्या शोषणाचे हे उदाहरण आहे. निर्णयाला ५३ दिवस होऊनही स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान बोलतात. मात्र संसदेतून पळ काढतात, असा आरोपही त्यांनी केला. दहशतवाद्यांना होणारा काळ्या पैशांचा पुरवठा, भ्रष्टाचारी मंडळींकडील काळा पैसे बाहेर काढणे आणि बनावट नोटा बाहेर काढण्याचे उद्देशातील एकही उद्देश सफल झालेला नाही.  भाजपच्या नेत्यांकडे कोटय़वधींचे नवीन चलन सापडले. रोकडरहित व्यवहारांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देशात आज उपलब्ध नाहीत. नोटा बंदीनंतर सर्वसामान्यांसह शेतकरी, शेतमजूर, छोटे मोठे उद्योग व्यवसाय अडचणीत आले. या सर्वाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. ११ जानेवारी रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 4:33 am

Web Title: ncp congress alliance signals for nashik municipal corporation poll
Next Stories
1 बेशिस्त चारचाकी वाहनधारकांना केवळ २५० रुपये दंड
2 पर्यटकांसाठी ‘हॉलिडे कार्निव्हल’
3 छबू नागरे प्रकरणातील फरार संशयित अखेर पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X