31 October 2020

News Flash

साचेबद्ध शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड द्यावी

रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले.

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे प्रतिपादन

नाशिक : विज्ञानाचा आधार घेऊन युवकांनी वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान, कौशल्य आत्मसात करण्याची आणि  साचेबद्ध शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पवार बोलत होते.

रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील, यासाठी त्यांनी शिक्षणाचे काम सुरू केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची बीजे रोवली. त्यामुळे समाजातील गोरगरीब शिक्षित झाला. शिक्षणामुळे घरे बदलली, सुधारणा झाली. घराचे संपूर्ण चित्र बदलण्यात मुलींचे शिक्षण महत्त्वाचे ठरल्याचे सांगून पवार म्हणाले, शैक्षणिक जाळे निर्माण होण्यात महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आहेत. युवा पिढीने विज्ञानाच्या आधारे कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन आपले घर चालवावे. रयत शिक्षण संस्थेने साचेबद्ध शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान देण्यासाठी काम करावे.

नाशिक जिल्ह्य़ाने सुधारित पद्धतीने पिके घेऊन द्राक्ष, डाळिंबासह अनेक मालाचे उत्पादन वाढविले आहे. कृषी क्षेत्राप्रमाणे नाशिक जिल्हा शिक्षणातही नावलौकिक प्राप्त करेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, माजीमंत्री विनायक पाटील, डॉ. अनिल पाटील, अ‍ॅड. भगीरथ शिंदे आदी उपस्थित होते. विनायक पाटील, अनिल पाटील, अ‍ॅड. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

‘नाशिक-येवला रस्त्याचे काँक्रीटीकरण’

नाशिक-येवला रस्त्याचे संपूर्ण काँक्रीटीकरण केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पाच वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम शरद पवार करतात. तेच जाणता राजा आहेत. राज्यकर्त्यांनी कुठलीही टीका टिप्पणी करून वाद करण्यापेक्षा संक्रांतीनिमित्त तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि जनतेचे काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:53 am

Web Title: ncp congress sharad pawar akp 94 2
Next Stories
1 महापालिकेत ६० टक्के पदे रिक्त
2 नाशिक गारठले
3 ‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीरचा नागरी सत्कार
Just Now!
X