News Flash

नाशिकमध्ये भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन बळ

शिवसेना-भाजप युतीने राज्यातील सत्तास्थानी वर्षभराचा कालावधी नुकताच पूर्ण केला.

मराठवाडय़ाला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे मित्रपक्ष शिवसेनेसह सर्व पक्षांनी पालक मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर जिल्ह्य़ात भाजप विरोधात वातावरण निर्माण झाले असतानाच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याने विरोधकांच्या बाहूंमध्ये अधिकच बळ संचारले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुन्हा एकदा भाजपला लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधात बोलणे टाळणाऱ्या स्थानिक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता बदलत्या परिस्थितीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शिवसेना-भाजप युतीने राज्यातील सत्तास्थानी वर्षभराचा कालावधी नुकताच पूर्ण केला. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात युतीला कौल दिल्याने आघाडीच्या नेत्यांमध्ये सामसूम होती. त्यातच राष्ट्रवादीच्या काही माजी मंत्र्यांविरुद्ध विविध प्रकारच्या कारवाया सुरू झाल्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी इतर नेत्यांनीही भाजपविरोधात बोलणे टाळण्याचाच प्रयत्न केला. काही माजी मंत्र्यांनी आपल्याविरोधातही चौकशीचे लचांड लागेल की काय, या भीतीने गप्प राहाणे पसंत केले. नाशिक महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या मनसेविरोधात भाजपने बदलत्या परिस्थितीचा फायदा उठवीत अनेक वेळा आक्रमकपणा दाखविला.
स्थानिक पातळीवर या घडामोडी होत असताना वरिष्ठ स्तरावर सत्तास्थानी असलेल्या भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरू झाल्या. वेगवेगळ्या विषयांचे निमित्त करीत शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करू लागले. भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर होऊ लागले. असा प्रकार सुरू असताना जायकवाडीला नाशिकच्या गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचा विषय आला आणि स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांची कोंडी झाली.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याविरोधात स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय एकत्र आले असताना भाजप मात्र त्यापासून अलिप्त राहिले. भाजपच्या तिघा आमदारांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तर यादरम्यान नाशिकला फिरकण्याचे कष्टच घेतले नाहीत. त्यामुळे साहजिकच स्थानिक जनतेत भाजपविरोधात वातावरण तयार झाले. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत पराभव स्वीकारावा लागल्याने अंगात नवीन बळ संचारल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते भाजप विरोधात आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्यापासून तर, शहराध्यक्ष व आमदार जयवंत जाधव यांच्यापर्यंत सर्वच जण महाजन यांच्यावर तुटून पडले. महाजन आणि भाजपला कोंडीत पकडण्याची हीच संधी असल्याची जाणीव झाल्याने वातावरण असेच कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी यापुढे अधिकच आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:02 am

Web Title: ncp get new strength against bjp in nashik
टॅग : Bjp,Ncp
Next Stories
1 चोरटय़ांची दिवाळी
2 बोलेरो गाडी लंपास
3 नांदगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची भेट
Just Now!
X