राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना उमेदवारी

नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगळे रंग भरले असून दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या असणार आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. अ‍ॅड. शिवाजी सहाणे हे राष्ट्रवादीकडून तर  शिवसेना-भाजप युतीचे नरेंद्र दराडे हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले अ‍ॅड. सहाणे यांना उमेदवारी देण्यामागे राष्ट्रवादीचे बेरजेचे राजकारण असल्याचा युक्तिवाद नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवार ही अंतिम मुदत आहे. राज्यातील इतर जागांवरील समीकरणे जुळवीत शिवसेना-भाजपने प्रत्येकी तीन जागा वाटून घेण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जाते. त्यात नाशिकची जागा सेनेच्या वाटय़ाला गेल्याने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने सहाणे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी सहाणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी विधान परिषद सदस्य जयंत जाधव यांच्यासह अद्वय हिरे, अपूर्व हिरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची समीकरणे लक्षात घेऊन राष्ट्रवादीने सहाणे यांना उमेदवारी दिली आहे.

पक्षाकडे दुसरा उमेदवार नव्हता काय, या प्रश्नावर त्यांनी निवडून येण्याची क्षमता आणि बेरजेचे राजकारण याचा विचार केला गेल्याचे नमूद केले. पाच वर्षे सहाणे यांनी संघर्ष केला आहे. विद्यमान आमदार जयंत जाधव यांनी त्यांच्या नावास सहमती दर्शवली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असा प्रयत्न सुरू आहे.

राज्यातील दोन-तीन जागांवरून हा विषय अडला आहे. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय होईल, असे पाटील यांनी सूचित केले. पक्षात प्रवेश करून झटपट उमेदवारी देण्याची भाजपची पद्धत राष्ट्रवादीने अनुसरली.

इतकेच नव्हे तर, दुपारी लगेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे गुरुवारी दुपारी अर्ज भरणार आहेत. या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्यासह सेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सेनेने म्हटले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची सायंकाळी संयुक्त बैठक होणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. राजकीय पटलावरील या घडामोडींनी निवडणूक दुरंगी होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.

सेनेकडे सर्वाधिक मतदार

निवडणुकीसाठी एकूण ६५१ मतदार असून त्यात सर्वाधिक २०७ शिवसेनेकडे तर भाजपचे १७८ आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या १७१ आहे. माकप १३ तर इतर लहान पक्ष आणि अपक्ष ८२ मतदार आहेत.