17 December 2018

News Flash

गुजरातमध्ये काँग्रेसला साथ-पवार

गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत राष्ट्रवादी नऊ ते दहा जागा लढविणार

शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

‘जीएसटी’ बाबत भाजप सरकारने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूमिका बदलण्याची खेळी केली. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत राष्ट्रवादी नऊ ते दहा जागा लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे सांगितले. उध्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेना सत्तेतून बाहेर न पडता केवळ तसे इशारे देत दोन वर्ष काढेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी शनिवारी दिंडोरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय समितीसोबत केलेला दौरा याच कारणासाठी आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर असून अर्थ खात्याशी त्याबाबत चर्चा केली जाईल. पाठपुरावा करूनही प्रश्न न सुटल्यास शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडण्याची तयारी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी हा सावळागोंधळ आहे. यादीत अनेक त्रुटी असून काही शेतकऱ्यांना अवघे १२० रुपयांची कर्जमाफी मिळाली. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची टिंगल करू नये, असेही त्यांनी सूचित केले. थकबाकीदार शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. या स्थितीत कर्जातील दीड लाखावरील रक्कम ते कसे भरणार ? सरकारचा कर्जमाफीबद्दल हेतू स्पष्ट नाही. शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्ज मिळायला हवे. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. परंतु, वैद्यकीय अहवालात विषाचा अंश नसल्याचे समजले. हे गंभीर असून त्याची सर्व कागदपत्रे आपण मागवली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीही घडले की, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नाव घेतात. याचा गांभीर्याने विचार व्हावा. सरकार सध्या रोज ‘मी लाभार्थी’ नावाने जाहिरात करत आहे. या जाहिरातीचा सरकारला कितपत फायदा होतो ते माहीत नाही. पण वृत्तपत्रांना नक्कीच फायदा होतो असेही ते म्हणाले.

First Published on November 12, 2017 1:25 am

Web Title: ncp in gujarat legislative assembly election 2017