20 January 2019

News Flash

उत्तर महाराष्ट्रात बस्तान बसविण्यासाठी राष्ट्रवादीची रणनिती

ती वेळ येण्याकरिता प्रथम युद्धात उतरावे लागते.

तहात कोणत्याही अटीचा विचार होईल, पण ती वेळ येण्याकरिता प्रथम युद्धात उतरावे लागते. दोन हात करावे लागतात. आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस  नाशिक विभागात हल्लाबोल यात्रेद्वारे खिंड लढविण्याची तयारी करणार आहे. लढाईत उतरण्यापूर्वी सैन्याची जमवाजमव, वातावरण निर्मिती, रसद पुरवठय़ाचे मार्ग, अशी बरीच तजवीज करावी लागते. सत्ता नसताना ही कामे जिकिरीची ठरतात. औरंगाबाद विभागात हल्लाबोल यात्रेद्वारे वातावरण तापविल्यानंतर नाशिक विभागात त्याची पुनरावृत्ती करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहील. त्यासाठी १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्य़ात ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सांगता नाशिक येथे १० मार्च रोजी शरद पवार यांच्या जाहीर सभेने होणार आहे.

गेल्या वर्षी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेनंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने विभागात प्रथमच एकत्रितपणे दौरा करणार आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून अवसान गळालेल्या राष्ट्रवादीत प्राण फुंकण्याचा प्रयत्न म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. तीन वर्षांत पक्षातून अनेकांनी उडय़ा मारल्या. काही ठिकाणी पक्षात कोणी राहते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली. आर्थिक रसद पुरविणारी मंडळी एक तर भाजपला जाऊन मिळाली अथवा पक्षापासून अंतर ठेवून आहे. पडझडीच्या काळात नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना थोपवील असे स्थानिक नेतृत्व राहिले नाही. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात छगन भुजबळ हे कारागृहात गेल्यानंतर नाशिकमध्ये पक्ष दिशाहीन झाला. भुजबळांना जामीन मिळत नसल्याने सध्या समता परिषद आणि भुजबळ समर्थक ‘अन्याय पे चर्चा’ आणि ‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियान राबवित आहे. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा आणि भुजबळ समर्थकांचे अभियान एकाच वेळी होत आहे. राष्ट्रवादीने भुजबळांचा विषय बाजूला ठेवल्याची समर्थकांची भावना आहे.

भुजबळांच्या समर्थनार्थ ते विविध पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्या अंतर्गत भुजबळ समर्थकांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा राज यांनी संबंधितांचे कान टोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शक असणाऱ्या शरद पवार यांनी ठरवल्यास भुजबळ कारागृहातून सुटू शकतात, असे सांगून राज यांनी समर्थकांना पवार यांच्याकडे दाद मागण्याचा सल्ला दिला. या परिस्थितीत राष्ट्रवादीतील भुजबळ समर्थक पक्षीय यात्रेला किती, कसा प्रतिसाद देतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नाशिक, नगरसह खान्देशातील अर्थकारण कांदा, द्राक्ष ऊस, कापूस, मिरची, भाजीपाला अर्थात मुख्यत्वे कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. कृषिमालाचे घसरणारे भाव, आयात-निर्यातीवर प्रभाव टाकणारे निर्णय, कर्जमाफी योजनेतील गोंधळ आदी मुद्दय़ांवरून स्थानिक पदाधिकारी आंदोलने करतात. सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडतात. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात प्रसंगी भाजपशी हातमिळवणी करतात. यामुळे राष्ट्रवादीवर दुटप्पीपणाच्या होणाऱ्या आरोपांना पुष्टी मिळते.

जळगावमध्ये राष्ट्रवादी गटातटाच्या राजकारणात अडकला आहे. कधी काळी पक्षाचे पाच आमदार असणाऱ्या या जिल्ह्य़ात सध्या डॉ. सतीश पाटील हे एकमेव आमदार आहेत. विरोधी गटाच्या कुरापतींना वैतागून त्यांनी दोन वेळा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने पक्षाने तो स्वीकारला नाही. पक्षाची आर्थिक भिस्त सांभाळणारे अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर माजी खासदार ईश्वरलाल जैन हे देखील अलिप्त आहेत. माजी मंत्री गुलाब देवकर जळगाव ग्रामीणमध्ये अडकून पडले आहेत. परस्परांचे पाय खेचण्याच्या स्पर्धेमुळे पक्षाची पीछेहाट होत आहे. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने सर्वाना एकत्र आणून पक्षबांधणीचे आव्हान पेलावे लागणार आहे. आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये पक्षाचे अस्तित्व लोप पावल्याची स्थिती आहे. धुळे महापालिका ताब्यात असल्याने शहरात प्रबळ वाटणारा पक्ष ग्रामीण भागात नावापुरता आहे. बोंड अळीमुळे कापसाचे झालेले नुकसान, मिरचीला मिळालेले अत्यल्प दर हे शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न स्थानिक पातळीवर हाताळले गेले नाहीत. शेतकऱ्यांमधील अस्वस्थता लक्षात घेऊन हल्लाबोल यात्रेद्वारे मतपेटीची बेगमी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

First Published on February 9, 2018 1:46 am

Web Title: ncp in north maharashtra