पदाधिकारी विनयभंग प्रकरण

देवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारीचा एका संशयिताकडून विनयभंग करण्यात आला. या विरोधात महिला पदाधिकारी पोलिसांकडे गेली असता भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव आणत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केला आहे.

देवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा संशयिताकडून समाजमाध्यमाव्दारे विनयभंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी संबंधित महिला देवळा पोलीस ठाण्यात गेली असता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही. उलटपक्षी स्थानिक आमदार राहुल आहेर यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. संशयित आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांनी रात्री पोलीस ठाण्यात तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीवर हल्ला करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार होत असताना संशयितांनी अश्लील हातवारे, शेरेबाजी करत महिलेचा पोलिसांसमोरच पुन्हा एकदा विनयभंग केल्याचा आरोपही प्रेरणा बलकवडे यांनी केला आहे. याप्रकरणी विभागीय पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन संबंधित ठिकाणच्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासणीत केदा आहेर आणि त्यांचे कार्यकर्ते मारहाण करताना दिसत असल्याचे आपण सांगितल्यावर महानिरीक्षकांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात येईल, अशी हमी दिल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

दरम्यान, सर्व आरोप चुकीचे असून तसे काहीही घडलेले नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. पोलीस त्यांची कायदेशीर प्रक्रिया करत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदारांचे नातेवाईक केदा आहेर यांनी दिली आहे.