X

सरसकट कर्जमाफीसाठी रास्ता रोको

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडीवरून मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आला.

सरकारने जाहीर केल्यानुसार सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, कृषिमालास उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सटाणा येथे बैलगाडीवरून मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अलीकडेच शेतकऱ्यांना आपली ताकद दाखविण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीने लगोलग आंदोलन करत शेतकऱ्यांना आपलेसे करण्याची धडपड सुरू केली. शेतकरी बिकट स्थितीला तोंड देत आहे. त्यास भाजप-सेना युती सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सटाणा येथे आंदोलन केले.

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडीवरून मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष खेमराज कोर, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदींची भाषणे झाली. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा. कृषीमालाची खरेदी करावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पतपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

अस्मानी तसेच सुलतानी संकटांपुढे शेतकरी हतबल झाला आहे. कर्जबाजारी झाल्याने तो आत्महत्येकडे वळत आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे होते. त्याकरिता शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभारले. त्याची दखल घेऊन सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, परंतु त्यात सरसकट कर्जमाफी न देता विविध निकष टाकल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही.

बागलाण तालुक्यात महिला शेतकरी भगिनीनेदेखील आत्महत्या केल्याचे भयानक वास्तव असून याला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकार विरोधात आक्रमक होण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

Outbrain