News Flash

.. राष्ट्रवादी रस्त्यावर

सरकारच्या निष्काळजीपणाचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या हेतूने पंतप्रधानांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट होत असल्याने पक्षाने त्याचे स्वागत केले, मात्र हा निर्णय घेण्याआधी तसेच त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याबाबत सरकारने कोणतेही नियोजन केले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारच्या निष्काळजीपणाचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. कृषी, कष्टकरी, असंघटित कामगार यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला.

रोख रकमेअभावी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या हंगामातील पेरण्यासाठी बी-बियाणे, खते व औषधे मिळणे दुरापास्त झाले. जवळपास सर्वच शेतमालाचे भाव कोसळले आहेत. कांदा, टोमॅटो व इतर शेतपिके कवडीमोल भावाने विकली जात असून रोखीचे व्यवहार ठप्प झाले.

सहकारी बँका व पतसंस्थांवर घातलेल्या र्निबधामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेला शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना बँकेतील स्वत:चे पैसे मिळणे अवघड झाले आहे. व्यापारी वर्गाचे खेळते भांडवल बंद झाले. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बाधित झाली असून सर्वाचे हाल होत आहे. या दृष्टचक्रात देशभरात १०० हून अधिक जण मृत्युमुखी पडले. देशात आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत तातडीने सुधारणा करावी, त्या अनुषंगाने केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या वेळी आ. जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले आदी उपस्थित होते.

दरम्यान, अलीकडेच शरद पवार यांनी नाशिक दौऱ्यात नोटाबंदीच्या निर्णयाबाबत शांत बसता येणार नसल्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले खरे, पण त्यात औपचारिकता अधिक असल्याचे दिसले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:58 am

Web Title: ncp protest against demonetization
Next Stories
1 राष्ट्रवादीचे वैभव लुप्त!
2 प्रक्रिया उद्योगावर टोमॅटो उत्पादकांची भिस्त
3 कांद्यानंतर आता टोमॅटोवर संक्रांत
Just Now!
X