*  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शरद पवार यांना गाऱ्हाणे

 *  पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

विशेष प्रतिनिधी, नाशिक

भात अगदी काढणीवर आला होता. पावसामुळे तो सोंगता आला नाही. नाहीतर दिवाळी दणक्यात साजरी झाली असती. आता मात्र काहीच राहिले नाही. शेतात पाणी साचून भात पीक सडले. द्राक्ष बागांसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. परतीच्या पावसाने शेतकरी अडचणीत सापडला, असे वास्तव सांगत सांगा आम्ही कसं जगायचं? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना जिल्ह्य़ात ठिकठिकाणी विचारला गेला.

त्यावर पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी तातडीने मदत देण्यासाठी शासनाला भाग पाडले जाईल, असे आश्वासन दिले. पीक विमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय असून पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांवरही कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ  देणार नसल्याची त्यांनी हमी दिली.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्य़ात सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळपास निम्म्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. मका, द्राक्ष, सोयाबीन, उशिराचा खरीप कांदा, भाजीपाला, टोमॅटो असे कोणतेही पीक तडाख्यातून सुटलेले नाही. १५ पैकी जवळपास १४ तालुक्यांतील शेतीला पावसाची झळ बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नाशिकमध्ये दाखल होताना घोटी टोल नाक्यालगतच्या परिसरात भात पिकाची स्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. टाके घोटी येथील शेतात ते गेले. शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महिलांनी ओढावलेले संकट कथन केले. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी हैराण झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पीक सततच्या पावसाने भिजून गेले. कापणी केलेले पीक खराब झाले. शेतकरी वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना न्याय द्यावा, तातडीने नुकसानभरपाई मिळावी, आदी मागण्यांचे निवेदन शेतकरी, पदाधिकाऱ्यांनी पवार यांना दिले.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पीक नुकसानीचे पंचनामे रखडले. त्यामुळे हे पंचनामे कधी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मंडळनिहाय पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, असे साकडे शेतकऱ्यांनी पवार यांना घातले. या वेळी हिरामण खोसकर, माणिक कोकाटे, सरोज अहिरे हे आमदार उपस्थित होते.

दरम्यान, दिवंगत काँग्रेस नेते गोपाळ गुळवे यांचा स्मृतिदिन असल्याचे समजताच पवार यांनी बाजार समिती आवारातील गुळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.

जिल्ह्य़ात नैसर्गिक संकटामुळे शेतकरी उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे. नियमातील अत्यल्प भरपाई देण्याची तरतूद काढून बिकट स्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला भाग पाडले जाईल. पीक विमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय आहेत. पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही.

– शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी)