News Flash

गॅस दरवाढीविरोधात ‘राष्ट्रवादी’च्या महिला रस्त्यावर

घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान संपुष्टात आणण्याच्या दिशेने सरकार पावले टाकत आहे.

भगूर येथे तिरडीवर सिलिंडर ठेवत दुसरीकडे रस्त्यावर चुलीवर स्वयंपाक करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी ग्रामीण भागात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. कुठे रस्त्यावर चूल पेटवली गेली तर कुठे गॅसची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. भगूर, बागलाण, नांदगाव, कळवण, त्र्यंबक, निफाड, सिन्नर आदी ठिकाणी महिला रस्त्यावर उतरल्या.

घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान संपुष्टात आणण्याच्या दिशेने सरकार पावले टाकत आहे. त्या अंतर्गत दर महिन्याला गॅस कंपन्या सिलिंडरच्या दरात वाढ करीत असून त्यामुळे जनतेत अस्वस्थता पसरली आहे. दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा स्वीकारला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाल्यानंतर शुक्रवारी तालुक्यांच्या ठिकाणी अभिनव मार्ग अनुसरण्यात आला. भगूर येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. यामुळे महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आल्याचे दर्शविण्यासाठी महिलांनी भगूर नगरपालिकेसमोर चूल मांडत भाजप सरकारचा निषेध केला. ‘मोदी तेरे राज मे, जनता बुरे हाल मे’, ‘केंद्र सरकार हाय हाय’, ‘मोदींजी का देखो खेल, महंगा सिलेंडर, महंगा तेल’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा महिला कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून काढण्यात आली. आंदोलनात बलकवडे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, सायरा शेख आदी सहभागी झाल्या होत्या.

सिन्नर येथे मेघा दराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरवाढीचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. गॅस सिलिंडरची दरवाढ तातडीने रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले. बागलाण येथे अ‍ॅड. रेखा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तर मनमाड येथे अपर्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आंदोलने झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:07 am

Web Title: ncp women protest on road against gas prices rise
Next Stories
1 बँक व्यवस्थापकाकडूनच ग्राहकांची फसवणूक
2 २३० कोटींचा गोदा प्रकल्प आराखडा मंजूर
3 संजय निरुपम यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन
Just Now!
X