|| चारूशीला कुलकर्णी

वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहांची कमतरता

नाशिक : ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ या उक्तीचा प्रत्यय देहदान ही संकल्पना देते. मात्र समाजात अवयवदान, देहदानाविषयी कमालीचा संभ्रम असून देहदान करणाऱ्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.  सामाजिक संस्था प्रयत्नशील असल्या तरी ‘देहदान’ संदर्भात केवळ अर्ज भरत औपचारिकता पार पाडली जात असल्याचे चित्र शहर परिसरात आहे.

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी, अपघाताशी संबंधित जलद उपचारासंबंधित तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मानवी मृतदेह गरजेचा आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा मृतदेहांची कमतरता असून त्यामुळे वैद्यकीय विशेषत शस्त्रक्रिया विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

नाशिक शहराचा विचार केला तर मविप्र वैद्यकीय महाविद्यालय, इगतपुरी येथील एस.एम.बी.टी. महाविद्यालय आणि पंचवटी येथील आयुर्वेद सेवा संघ महाविद्यालयात देहदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी दान म्हणून येणाऱ्या मृतदेहांचा वापर हा विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र अभ्यास, शस्त्रक्रियेसाठी करण्यात येतो. याविषयी मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी देहदानाचा वैद्यकीय शिक्षण-संशोधनासाठी उपयोग होत असला तरी अभ्यास आणि संशोधनासाठी मृतदेहांचा तूटवडा जाणवत असल्याचे सांगितले.

रुग्णालयात वर्षांकाठी २०-३० व्यक्तींचे देहदान होते. याविषयी प्रबोधन करण्यासाठी महाविद्यालय व्याख्यान, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. देहदानाविषयी विचारणा करणाऱ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष देहदान यात कमालीची तफावत आहे. देहदान हे व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नातेवाईकांच्या मानसिकतेवर आणि खंबीरतेवर अवलंबून आहे. परंपरेने अग्नीसंस्कार करायचा की आधुनिकतेचा अवलंब करायचा  या  वैचारिक द्वंदावर सारे अवलंबून असल्याचे आयुर्वेद सेवा संघाच्या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नरेश गुप्ता यांनी सांगितले.देहदानाचा अर्ज नेणाऱ्यांमध्ये वृध्दांची संख्या अधिक आहे. प्रत्यक्षात मात्र त्यातील खूप कमी व्यक्तींचे नातेवाईक महाविद्यालयात संपर्क साधतात, याकडे डॉ. गुप्ता यांनी लक्ष वेधले.

देहदान असे होते 

शहरात वैद्यकीय महाविद्यालय संलग्न असलेल्या रुग्णालयात देहदानाचा अर्ज भरून आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे. या अर्जावर कुटूंबातील अन्य सदस्यांची स्वीकृती स्वाक्षरी घेण्यात येते. व्यक्तीच्या मृत्यू पश्चात संबधित महाविद्यालय किंवा रुग्णालयाशी संपर्क साधत मृतदेह नेण्याविषयी विचारणा होते. हा मृतदेह ताब्यात आल्यावर काही रासायनिक प्रक्रिया करत तो ‘प्रिझव्‍‌र्ह’ केला जातो. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी याचा वापर होतो.