नाशिक : शहरातील रुंग्टा कन्या विद्यालयात आता राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त  नीला सत्यनारायण यांच्या केवळ आठवणी उरल्यात. नीला सत्यनारायण यांचे करोनामुळे गुरुवारी पहाटे मुंबईत निधन झाल्याची बातमी येताच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धक्का बसला. सत्यनारायण या अशोकस्तंभ येथील  पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहात आठवणींना उजाळा दिला.

सत्यनारायण यांनी १९५९ मध्ये इयत्ता पाचवीत पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यापूर्वी इयत्ता चौथी त्यांनी संस्थेच्या मोहिनीदेवी रुंग्टा बाल मंदिरात पूर्ण केली होती.  प्रशासकीय पातळीवर उच्च अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी नाशिकशी असलेले भावबंध कायम जपले. निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असताना आठ वर्षांपूर्वी सत्यनारायण यांनी पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयास भेट दिली होती. या भेटीत त्यांनी आपल्या स्मृतींना उजाळा देत शाळेच्या मैदानापासून इमारतीची पाहणी केली. ज्या वर्गात शिक्षण घेतले ते वर्ग, शाळेचे वेगवेगळे फलक, आसन व्यवस्था सारे काही निरखून त्या काळात हरखून गेल्या होत्या. नंतर शाळेच्या कार्यालयात संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी आणि शिक्षकांशी शाळेच्या प्रगतीविषयी चर्चा केली होती.  विशेष म्हणजे  त्यांनी विद्यार्थिनींसोबत संस्थेची प्रार्थना ‘हे परमत्मन् जगणं निवासा’ म्हटली होती. त्यांच्या काळातील शिक्षक आणि शाळेची माहिती सांगून शालेय जीवनातील आठवणींचा खजिना मुलींसमोर खुला केला होता.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त  नीला सत्यनारायण या  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकस्तंभ येथील  पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी होत्या. संस्थेला त्यांचा अभिमान होता. त्यांनी प्रशासकीय सेवेत राज्यात उल्लेखनीय कार्य केले.  तसेच त्या लेखिकाही होत्या. संस्थेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन.

– अश्विनीकुमार येवला (सचिव, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ)