चेन्नईत परीक्षेसाठी मुलांवर शर्टच्या बाह्य़ा कापण्याची वेळ; ठाणे, नाशिकमध्येही परीक्षा देणाऱ्यांना मनस्ताप

देशभरात रविवारी पार पडलेल्या ‘नीट’च्या परीक्षेदरम्यान ‘काय करावे आणि काय करू नये’ याबाबत दिलेले नियम अनेक उमेदवारांना माहिती न झाल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

नीट परीक्षेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी अध्र्या बाह्य़ांचे शर्ट घालून येणे अपेक्षित होते. नीट परीक्षेसाठी जे विद्यार्थी पूर्ण बाही असलेला शर्ट घालून आले होते, त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा केंद्रावर फक्तअर्धा बाही असलेल्या शर्टलाच परवानगी असल्याचे सांगण्यात आले. त्याला कोणताही पर्याय नसल्याने अनेकांना आपल्या शर्टाची बाही अर्धी करावी लागली. त्यानंतर संबंधित उमेदवारांना प्रवेश देण्यात आला.

अनेक उमेदवार बूट घालून आले होते. ते त्यांना बाहेरच काढावे लागले. अनेक मुलींना हेअर पिन, कानातील रिंगा, बॅण्ड्स, नाकातील नथी  काढून ठेवाव्या लागल्या. याला परीक्षा केंद्रावर परवानगी देण्यात आली नव्हती.

काही जणांनी पेन, पेन्सिलसारख्या वस्तू खरेदी केल्या होत्या, मात्र त्यांना त्यांच्या पालकांकडे या वस्तू दिल्यानंतर केंद्रावर प्रवेश देण्यात आला. सीबीएसईने स्वत:हून उमेदवारांना पेन देण्याची सुविधा दिली होती.

परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी सीबीएसईने अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहताना काय करावे आणि काय करू नये याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांना हे नियम न समजल्यामुळे अनेक परीक्षा केंद्रांवर गोंधळ पाहायला मिळाला.

काही विद्यार्थ्यांना तेलगु भाषेतील प्रश्नपत्रिका मिळण्याऐवजी हिंदी आणि इंगजी प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेकांना परीक्षा केंद्रे शोधताना जड गेले. काही मिनिटे उशीर झाला तरी अनेकांना प्रवेश नाकारण्यात आला. बिहारमध्ये प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रयत्नात पाच जणांना अटक करण्यात आली.

११ लाख उमेदवार

नीट २०१७ साठी ११ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेसाठी देशभरात जवळपास १ हजार ९०० पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे होती. एमबीबीएसच्या ६५ हजार आणि बीडीएसच्या २५ हजार जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. ११ लाख ३८ हजार ८९० पात्र उमेदवारांमध्ये १ हजार ५२२ अनिवासी भारतीय आणि ६१३ विदेशी उमेदवारांचा समावेश होता.

चुकीच्या पत्त्यामुळे नुकसान

नाशिक : ‘नीट’ प्रवेशपत्रावर केंद्राचा भलताच पत्ता दिल्याने दिडशेपेक्षा अधिक परीक्षार्थीचे नुकसान झाले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला. या धावपळीत वेळेचा अपव्यय झाल्याने परीक्षार्थीचे नुकसान झाले. पालकांचेही हाल झाले. मंडळाच्या घोळामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

तीन मिनिटांच्या उशिरामुळे  विद्यार्थ्यांचे वर्ष वाया

ठाणे  : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास दोन-तीन मिनिटे उशीर झाल्याने ठाण्यातील चार विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेस बसता आले  नाही. येथील सावरकरनगर परिसरातील ज्ञानोदय विद्यामंदिर या केंद्रावर  पोहोचण्यास उशीर झाल्याने या विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. पालकांनी विनवण्या करूनही विद्यार्थ्यांना आत न घेतल्याने त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती पालकांनी व्यक्त केली.

पनवेल, भिवंडी, मुरबाड, कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा आदी परिसरातून विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. केंद्रावर पोहोचण्यासाठी तीन मिनिटांचा उशीर झाल्याने ऐश्वर्या कदम (कल्याण), शेख अब्दुलाह (भिवंडी), काजल कुमारी (पनवेल), मोनिका मोरे (धसई) या विद्यार्थ्यांना केंद्रावरील प्रवेश नाकारण्यात आला.  मोनिका मोरे ही धसई येथून आली होती. सकाळी चार वाजता तिने परीक्षेसाठी घर सोडले होते. लवकर घर सोडूनही परीक्षेस पोहचण्यास उशीर झाल्याने ती हताश झाली.

फेरपरीक्षेची मागणी

बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ही परीक्षा महत्त्वाची आहे, ती देता न आल्याने आता विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल, अशी भीती वाटत आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही, त्यांच्यासाठी फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी या वेळी पालकांनी केली.

ठाणे : रविवारी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास दोन-तीन मिनिटे उशीर झाल्याने ठाण्यातील चार विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेस बसता आले  नाही.