नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागातील नेहरू उद्यानाचे लोकार्पण स्मार्ट सिटी कंपनीने स्थगित केले असले तरी ते बुधवारपासून शहरवासीयांसाठी परस्पर खुले करण्यात आल्याने सत्ताधारी ‘भाजप’सह विरोधी नगरसेवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उद्यानातील कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचे लोकार्पण पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे ‘भाजप’चे नियोजन आहे. पंडित नेहरू जयंतीनिमित्त उद्यानातील नेहरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याच्या कार्यक्रमात उद्यानाचे लोकार्पण करण्याचा स्मार्ट सिटी कंपनीचा प्रयत्न होता. त्यास नगरसेवक शाहू खैरे यांनी विरोध केला. महापौरांनी उद्यानातील उर्वरित कामे मार्गी लावण्याची सूचना केली होती. असे असताना पालिका आयुक्तांच्या निर्देशावरून उद्यान विभागाने हे उद्यान शहरवासीयांसाठी खुले केल्यामुळे सत्ताधारी-विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महापालिकेत काही महिन्यांपासून सत्ताधारी ‘भाजप’ आणि प्रशासन यांच्यात संघर्ष सुरू आहे. ‘भाजप’चे पदाधिकारी प्रशासनाच्या कामात खोडा घालतात, तर प्रशासन नियमांवर बोट ठेवून सत्ताधाऱ्यांवर चाप ठेवत आहेत. या उद्यानाचे बुधवारी गुपचुप लोकार्पण करण्याचा स्मार्ट सिटी कंपनीचा प्रयत्न होता. मुळात मध्यवर्ती भागातील हे उद्यान अतिक्रमणांच्या वेढय़ात आहे. उद्यानात खेळणी बसविली गेलेली नाहीत. या उद्यानात नेहरूंसह कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचाही पुतळा आहे. गायकवाड यांच्या पुतळ्याची स्वच्छता आणि इतर प्रलंबित कामे पूर्ण झाली नसताना लोकार्पणाचा घाट का घातला जात आहे? असा प्रश्न नगरसेवक शाहू खैरे यांनी उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन महापौरांनी स्मार्ट सिटी कंपनीला उद्यानातील कामे प्रथम पूर्ण करावीत आणि नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्याचे निर्देश दिले होते. महापौरांच्या निर्देशामुळे नियोजित लोकार्पण स्थगित झाले. परंतु, बुधवारी हे उद्यान सर्वासाठी खुले करण्यात आले. आयुक्त मुंढे यांच्या सूचनेवरून नेहरू उद्यान खुले करण्यात आल्याचे स्मार्ट सिटी कंपनीने म्हटले आहे.

या संदर्भात आयुक्त मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्यान शहरवासीयांसाठी खुले करण्यात आल्याचे सांगितले. नेहरू जयंतीच्या दिवशी स्मार्ट सिटी कंपनीने ते खुले व्हावे म्हणून कंपनीच्या संचालकांना निमंत्रित केले होते. उद्यानातील किरकोळ स्वरूपाची कामे लवकर मार्गी लागतील, स्मार्ट उद्यानाचा नागरिकांना लाभ घेता येईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

स्मार्ट नेहरू उद्यानातील कामे पूर्ण न करता ते खुले करणे अयोग्य आहे. स्मार्ट सिटी योजनेला केंद्रासह राज्याकडून निधी मिळाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि शहरातील भाजपचे तीन आमदार यांच्या उपस्थितीत नेहरू उद्यानाचे लोकार्पण केले जाईल. प्रशासनाने लोकप्रतिनिधींचा सन्मान राखायला हवा. उद्यानातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची स्वच्छता आणि इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश आपण दिले होते. कामे झाली नसताना उद्यान खुले करणे अयोग्य आहे. आयुक्तांची ही हिटलरशाही आहे.

– रंजना भानसी  (महापौर)

स्मार्ट नेहरू उद्यान शहरवासीयांसाठी खुले करण्याची सूचना पालिका आयुक्तांनी उद्यान विभागाला केली आहे. त्यानुसार हे उद्यान खुले करण्यात आले.

– प्रकाश थविल (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी)