भिजल्याने नोटेचा रंग उडाला

५०० आणि हजार रूपयांच्या नोटांवरील बंदी आणि नवीन नोटा मिळण्यास होणारी अडचण यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असताना  दोन हजारच्या नोटेचा रंग अवघ्या काही तासात फिका पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही नोट कपडय़ांवर घासली गेल्यास अथवा भिजल्यास रंग फिका पडत असल्याचे समोर आले आहे. विविध सुरक्षा मानकांनी परिपूर्ण अशी दोन हजाराची नोट असल्याचा दावा केला गेला असला तरी या नोटेचा रंग उडू लागल्याने त्या मानकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नवीन चलन अशा प्रकारे  फिकट पडल्यास त्यांच्या वापरावर मर्यादा येईल, शिवाय त्यांच्या आयुर्मानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जुन्या नोटा जमा करणे आणि त्याबदल्यात नवीन नोटा घेण्यासाठी सर्वत्र बँका आणि एटीएमपुढे रांगा लावणे एवढे एकच काम सध्या नागरिकांसाठी शिल्लक राहिले आहे. या धामधुमीत ज्यांच्या हाती दोन हजार रुपयांची नोट पडली, त्यातील काहींकडून तिचा रंग उडत असल्याच्या तRारी होऊ लागल्या आहेत. दोन हजाराची नोट खिशात राहिल्यास कपडय़ाला तिचा थोडाफार रंग लागतो. या नोटेला पाण्याचा स्पर्श झाल्यास म्हणजे ती भिजल्यास रंग अधिक प्रमाणात फिकट होतो. असे असताना पावसाळ्यात या नोटांचा वापर कसा करता येईल, असा त्यांचा प्रश्न आहे.

वास्तविक चलन निर्मिती प्रRियेत  सुरक्षा मानकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. बनावट चलन निर्मिती होऊ नये यासाठी या मानकांचे महत्त्व असते. असे असताना या नवीन नोटांचा रंग पाणी लागल्यास लगेचच फिकट होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाण्याचा स्पर्श झाल्यास दोन हजारच्या नोटेवरील गांधीजींची प्रतिमा पुसट होणे हा गंभीर प्रकार असल्याचे मत भारत प्रतिभृती मुद्रणालयातील निवृत्त गुणवत्ता निरीक्षक पी. एन. आडके यांनी व्यक्त केले आहे. या नोटेसाठी वापरण्यात आलेला कागद आणि शाईच्या दर्जाविषयी साशंकता आहे. महिनाभर जर ही नोट व्यवहारात राहिली, तर कदाचित कोरा कागदच शिल्लक राहील. खेळण्यातील नोटांप्रमाणे या नोटेचा दर्जा दिसून येत आहे. नाशिकरोडच्या मुद्रणालयात दोन हजाराच्या नोटांची छपाई झालेली नाही. या ठिकाणी नवीन ५०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू आहे. जुन्या ५०० आणि एक हजाराच्या नोटांचा हाताळणी वा भिजल्याने कधी रंग उडाला नव्हता. नवीन दोन हजाराच्या नोटेत तसे घडत असल्याने ही गंभीर बाब आहे. यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही आडके यांनी केली आहे.