उन्हाळ ४००, लाल कांद्याच्या भावात हजार रुपयांनी वाढ

नाशिक : दिवाळीच्या सुट्टीनंतर सात दिवसांनी उघडलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा दराने नव्याने उसळी घेतली. मागील आठवड्यात बाजार बंद होण्यावेळी ३६०० रुपये क्विंटल दर असलेल्या उन्हाळ कांद्याला गुरुवारी सरासरी चार हजार रुपये भाव मिळाला. तर कमी आवक असलेल्या नव्या लाल कांद्याच्या दरात हजार रुपयांनी वाढ होऊन तो ४,१०० रुपयांवर पोहोचला. इतर बाजार समित्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती आहे.

महानगरांमध्ये परदेशी कांद्याचे आगमन, स्थानिक कांद्यासाठी व्यापाऱ्यांना साठवणूक मर्यादेचा निकष आणि नव्या लाल कांद्याची आवक सुरू झाल्याचा फटका महिन्याच्या प्रारंभी उत्पादकांना बसला होता. कांदा दर नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवरून झालेल्या प्रयत्नांमुळे मोठे नुकसान झाल्याची संतप्त प्रतिक्रिया उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या महिन्यात साडेसहा ते सात हजारांचा टप्पा गाठणाऱ्या कांद्याच्या दरात अल्पावधीत तीन ते साडेतीन हजार रुपयांनी घट झाली होती. दरवाढ झाल्यानंतर केंद्राने व्यापाऱ्यांवर साठवणूक मर्यादेचे निर्बंध घातले. परदेशातून कांदा आयात केला. याच काळात राज्य सरकारने केंद्राकडे साठवणूक मर्यादेत मोठी वाढ करण्याची मागणी केली होती. परंतु ती मान्य झाली नाही. केवळ आज खरेदी केलेला कांद्याची प्रतवारी करणे, गोणीत भरणे तत्सम कामांसाठी तीन दिवस साठवण्याची मुभा दिली.

या घटनाक्रमात दिवाळीमुळे लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितींचे कामकाज बंद होते. साधारणत: सात दिवसांनंतर म्हणजे गुरुवारी बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषिमालाचे लिलाव सुरू झाले. या दिवशी मोठ्या प्रमाणात माल येऊन दर घसरतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, तसे घडले नाही. कांदा उत्पादक संघटनेने उत्पादकांनी टप्प्याटप्प्याने आपला माल बाजारात नेण्याचे आवाहन केले आहे. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलला ४०० तर लाल कांद्याच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली. गुरुवारी पहिल्या सत्रात साडेसहा हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्यास सरासरी चार हजार रुपये भाव मिळाला. नवीन लाल कांद्याची १२५ क्विंटल आवक झाली. त्यास सरासरी ४१०० रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. ११ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याचे सरासरी भाव ३६०० तर लाल कांद्याला ३१०० रुपये होते. दिवाळीनंतर कांद्याची मागणी पुन्हा वाढल्याने दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक कांद्याचे भाव वाढण्यामागे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी हे कारण आहे. परदेशातून मागविलेल्या कांद्याला चव नसल्याने तो कोणी खरेदी करत नाही.  व्यापाऱ्यांची तो विकताना दमछाक झाली. उन्हाळ कांद्याचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे नव्या लाल कांद्याचे उत्पादन लांबले आहे. या घडामोडींचा प्रभाव कांद्याच्या घाऊक बाजारावर पडत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरच्या अखेरीस ही स्थिती निर्माण झाली होती. तुटवड्यामुळे कांदा भावाने तब्बल १० हजारांचा टप्पा गाठला होता. यंदा दिवाळीनंतर भाव वधारल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.