जुन्या खरेदी खतात फेरफार; प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केलेल्या जुन्या खरेदी खतात फेरफार करून अन्य खरेदी खत नोंदविल्याचे भासवत जमीन लाटण्याचे धक्कादायक प्रकरण नाशिक जिल्ह्यतील देवळा तालुक्यात उघडकीस आले आहे. अशा प्रकारे फसवणूक करून जमीन गिळंकृत करण्याची ही नवीनच पध्दत समोर येत असून त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असतानाही या संदर्भात प्रशासकीय पातळीवर मात्र कमालीची उदासिनता प्रत्ययास येत आहे.

गिरणारे येथील भास्कर निकम या शेतकऱ्याची मेशी शिवारातील वडिलोपार्जित शेतजमीन लाटण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात वडील धर्मा निकम यांचे निधन झाल्याने भास्कर हे वडिलांच्या मिळकतीवर वारस नोंद लावण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले असता एका तथाकथित खरेदीखताच्या दस्तान्वये वडिलांच्या मिळकतीवर नाव सदरी लावण्यासाठी तेथे एक अर्ज दाखल असल्याची माहिती त्यांना समजली. अर्ज व कथित दस्ताच्या आधारे या मिळकतीवर संशयित खरेदीदाराची महसूल दप्तरी मालकी हक्काची नोंददेखील लागली.

वहिती आणि पोटखराबा असे एकूण तीन हेक्टर ५० आर क्षेत्र असलेल्या या मिळकतीची विक्री झालेली नसताना सन २०१२ मध्येच तिची विक्री झाल्याचे तलाठी कार्यालयात सादर झालेल्या खरेदीच्या दस्तावरून अधोरेखित झाल्याने भास्कर यांना धक्का बसला. आठ वर्षांपूर्वी खरेदी झाल्याचे दाखवत फेरफारसाठी आता अर्ज दाखल केलेल्या या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यावर भास्कर यांना अत्यंत धक्कादायक माहिती हाती लागली.

२०१२ मध्ये देवळा येथील सहउपनिबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याचे भासविण्यात आलेल्या या तथाकथित खरेदीखताचा जो दस्त क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे, तो लोहणेर येथील एका महिला शेतकऱ्याने खरेदी केलेल्या भूखंडाच्या दस्ताचा असल्याचे उघड झाले. लोहणेर गावाशी संबंधित या दस्तनोंदणीनुसार फेरफार नोंददेखील केंव्हाच मंजूर झालेली आहे. एवढेच नव्हे तर लोहणेर आणि मेशी येथील संबंधित वादग्रस्त खरेदीखत नोंदणीसाठीचा मुद्रांक क्रमांक, मुद्रांक किंमत आणि मुद्रांक विक्रेता एकच असल्याचे आढळून आले. यावरुन वडील धर्मा निकम यांच्या मिळकतीचे दाखविण्यात आलेले खरेदीखत बनावट असल्याचा संशय बळावल्याने भास्कर यांनी लढा सुरू केला आणि त्यानंतर जमीन लाटण्याचे हे प्रकरण चव्हाटय़ावर आले.

भास्कर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सह दुय्यम निबंधक कार्यालयाने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निकम यांच्या वडिलोपार्जित मिळकतीशी संबंधित खरेदीखताचा दस्त बनावट असल्याचे नमूद करत त्याच्या आधारे झालेली फेरफार नोंद रद्द करण्यासाठी महसूल खात्यासही सहदुय्यम निबंधक कार्यालयाने लेखी स्वरुपात कळविले आहे.

२०१२ मध्ये नोंदणी झालेले जुने खरेदीखत सह उपनिबंधक कार्यालयातून बेकायदेशीरपणे बाहेर नेऊन त्यात फे रफार केले गेले. त्यानंतर ते पुन्हा मूळ जागेवर आणून ठेवण्यात आले. साहजिकच या दस्ताच्या सत्यप्रतीसाठी त्यानंतर आलेल्या अर्जानुसार खरेदीखताची बनावट सत्यप्रत दिली गेली, अशा आशयाची हतबलता उपनिबंधक कार्यालयाच्या फिर्यादीतून व्यक्त होताना दिसत आहे.

२००८ ते २०१२ या कालावधीतले दस्त संगणकावर उपलब्ध होत नसल्याचे कारण देऊन अभिलेख कक्षातील उपलब्ध दस्तावरुन सत्य प्रत दिली गेल्याचे आणि नंतर ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले,असेही सह उपनिबंधक कार्यालयाने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास उशीर झालाच, पण गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटल्यावरही संशयितांना अद्याप अटक होऊ  शकलेली नाही.

उपनिबंधक कार्यालयाद्वारे प्राप्त दस्ताच्या सत्य प्रतीवरून नियमानुसार मेशी येथील संबंधित फेरफार नोंद प्रमाणित करण्यात आली आहे. मात्र नंतर दस्ताची प्रत बनावट असल्याची माहिती मिळाल्यावरून ही नोंद रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यात महसूल यंत्रणेचीदेखील फसवणूक झाली आहे.

– वसंत पाटील, (मंडल अधिकारी उमराणे ता.देवळा)